विवेक सौताडेकर यांची ‘ग्रामीण शब्दकोश निर्मिती’ मंडळावर निवड मराठवाडा साहित्य परिषदेचा महत्वकांक्षी प्रकल्प
लातूर : मराठवाडा साहित्य परिषद , छत्रपती संभाजी नगर येथील नूतन केंद्रीय कार्यकारिणीची पंचवार्षिक निवडणूक ९ नोव्हेंबर रोजी
पार पडली. या निवडणुकीत प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या ‘संस्था संवर्धन पॅनल’ चे २२ नवनिर्वाचित सदस्य निवडून आले. या कार्यकरणीची पहिली बैठक रविवार दि. २४ नोव्हेंबर २०२४ रोजी संपन्न झाली.
या बैठकीत मराठवाडा प्रदेश मराठी भाषेचे उगमस्थान असून या प्रदेशातील मराठी भाषा ही मूळ व मध्यवर्ती भाषा आहे. कालपरत्वे तिची रूपे बदलत गेली. आजची मराठी भाषा आणि पूर्वीची मराठी भाषा यात आज बरेच अंतर निर्माण झाले आहे, ते होतच असते. मराठीची मूळ नानाविध शब्दरूपे आजही ग्रामीण भागातील लोकजीवनात आढळताना दिसतात. परंतु ग्रामीण बोली भाषेतील हे जुने अनेक शब्द काळानुरूप लोप पावत आहेत. ते पुढील पिढ्यांसाठी जतन व संवर्धन करण्यासाठी ग्रामीण बोलीतील शब्दांचा आजच्या अर्थासहित एक शब्दकोश तयार करावा असा मराठवाडा साहित्य परिषदेचा मानस आहे.
साहित्य परिषदेच्या दृष्टीने भाषा संचिताचे हे काम अत्यंत महत्त्वाचे असून साहित्य परिषदेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी मराठवाड्यातील तज्ज्ञ लोकांना घेऊन मराठवाडास्तरीय ‘ग्रामीण शब्दकोश समिती’ची निर्मिती करण्यात आली आहे.
ही निवड पाच वर्षासाठी असून हा प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी ‘ग्रामीण शब्दकोश समिती’चे सदस्य म्हणून मराठवाडा साहित्य परिषद शाखा लातूरचे सदस्य व साहित्यिक विवेक सौताडेकर यांची परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, डॉ. आसाराम लोमटे ,कोषाध्यक्ष डॉ.रामचंद्र काळुंखे, कार्यवाह डॉ. दादा गोरे आदींनी बिनविरोध निवड केली आहे.
गेल्या पंचवीस वर्षापासून मराठी साहित्यात योगदान देणाऱ्या विवेक सौताडेकर यांचे ‘लातूर: काल आणि आज’, ‘मातीतील मोती’ , ‘महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर : चरित्र आणि विचारधन’, ‘गोजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज’, ‘झिंगणेश्वर स्वामी’ अशी एकूण १४ पुस्तके प्रकाशित असून तीसहून अधिक शासकीय व अशासकीय ग्रंथ, गौरवग्रंथ,विशेषांकाचे त्यांनी संपादन केले आहे. सौताडेकर हे लातूर जिल्हा शासकीय इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य असून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, संत कबीर प्रतिष्ठान, शारदोत्सव व्याख्यानमाला अशा अनेक समित्यांचे ते पदाधिकारी आहेत.ग्रामीण शब्दकोश निर्मितीच्या निवडीच्या अनुषंगाने त्यांचे रामचंद्र तिरुके, डॉ. जयद्रथ जाधव, रामचंद्र मदने तसेच
समाजाच्या विविध स्तरातून त्यांचे स्वागत होत आहे.