खा. डॉ. शिवाजी काळगे यांच्या प्रयत्नातून शासकीय दूध योजनेचे पुनरुज्जीवन होणार, केंद्रीय मंत्र्याकडून हिरवा झेंडा
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर येथील शासकीय दूध योजना आणि दूध भुकटी प्रकल्प एक तपाहून अधिक काळापासून बंद पडला आहे. मध्यंतरीच्या काळात शहराच्या मध्यभागी आलेल्या अब्जो रुपये किमतीच्या शासकीय दूध योजना आणि दूध भुकटी प्रकल्पाच्या तेरा एक करून अधिक खुली जागा आणि प्रकल्पासाठी उभारलेल्या इमारतीची जागा याच्यावर डोळा ठेवून, काही राजकीय पुढार्यांनी ही जागा खाजगी संस्थांना मिळावी. या दृष्टीने प्रयत्न चालवले होते. इतकेच नाही तर त्या प्रयत्नांना मूर्त स्वरूप देण्याच्या दृष्टीने शासकीय दूध योजना आणि दूध भुकटी प्रकल्पाची मशिनरी भंगारामध्ये विकण्याचा डाव ही रचला होता. तशा पद्धतीची निविदाही निघाली होती, आणि ती निविदा भरलेल्या कोल्हापूर येथील कंत्राटदाराने या दूध योजनेतील मशिनरी भंगार म्हणून खरेदी करण्यासाठी प्रयत्न करून ती मशनरी घेऊन जाण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र उदगीरच्या जनतेकडून आणि शासकीय दूध योजना पुनरुज्जीवन समितीकडून झालेल्या प्रखर विरोधामुळे त्या एजन्सीला भंगार म्हणून हि मशनरी घेऊन जाता आली नव्हती. त्यानंतरही उदगीरच्या तरुणांनी वेळोवेळी आंदोलन करून ही शासकीय दूध योजना पूर्ववत चालू करावी, जेणेकरून शेकडो तरुणांना रोजगार मिळेल. कित्येक लोकांना रोजगार मिळेल, तसेच या भागातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना शेतीपूरक जोडधंदा उपलब्ध होऊ शकेल. अशी शक्यता सांगत दूध योजना पूर्ववत सुरू करावी, अशी विनंती केली होती. मात्र राजकीय महत्त्वकांक्षेचा अभाव वेळोवेळी जाणवत गेला, आणि या योजनेकडे कोणीही म्हणावे त्या गांभीर्याने पाहिलेच नाही.
परिणामतः आज नाहीतर उद्या या शासकीय योजनेचे भंगार मध्येच विक्री होणार. अशी लोकांची धारणा बनलेले असतानाच, लातूर जिल्ह्याचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी निवडणुकीच्या दरम्यान दिलेल्या आश्वासनाची आठवण ठेवत, सात ऑगस्ट 2024 रोजी लोकसभेमध्ये उदगीरची शासकीय दूध योजना ही लोकांच्या हाताला काम देऊ शकणारी, शेकडो युवकांना रोजगार मिळवून देऊ शकणारी तसेच शेतकऱ्यांना जोडधंदा निर्माण करून देणारी योजना असल्याने या योजनेकडे विशेष लक्ष शासनाने द्यावे. आणि ही योजना पूर्ववत चालू करावी. अशा पद्धतीची विनंती केली होती. इतकेच नाही तर त्यानंतर त्यांनी पुन्हा 10 डिसेंबर 2024 रोजी पशुपालन एवम् दूध उत्पादन मंत्री राजीव रंजन सिंह यांच्याकडे पत्र पाठवून पाठपुरावा केला होता.
त्या पत्राची दखल घेत तथा लोकसभा कामकाजात केलेल्या मागणीचा विचार करून राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यांच्यासोबत चर्चा करून उदगीर येथील शासकीय दूध योजना आणि दूध भुकटी प्रकल्प चालू करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले होते, तेव्हा त्यांनी कळवले आहे की, हा प्रकल्प गेल्या 44 वर्षांपूर्वी निर्माण झालेला होता, आणि 2015 पासून कायम बंद आहे. त्यामुळे राष्ट्रीय डेरी विकास बोर्डाने मदर डेअरी फ्रुट्स अँड व्हेजिटेबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत महाराष्ट्र सरकार यांच्याकडे उदगीर येथील या योजनेच्या संदर्भामध्ये तथा पुन्हा चालू करण्याच्या संदर्भामध्ये योजना तयार करून माहिती पाठवली होती. त्याप्रमाणे मदर डेरी फ्रुट्स अँड व्हेजिटेबल प्रायव्हेट लिमिटेड यांनी दररोज 60000 लिटर दूध पाऊच आणि पंधरा ते वीस मॅट्रिक टन पॉली पाऊच फर्मेंटेड उत्पादक चालू करण्यासाठी एक विस्तृत योजना तयार केलेली आहे. आणि या योजनेच्या अनुषंगाने शासकीय दूध योजना आणि दूध भुकटी प्रकल्प पुन्हा पूर्ववत चालू करण्यासाठी जवळपास शंभर करोड रुपये आवश्यक आहेत. असे कळवले असून जर ही योजना पुन्हा पुनर्जीवित केली गेली तर पुन्हा ही योजना कायम चालू राहील असे मदर डेरी फ्रुट्स अँड व्हेजिटेबल प्रायव्हेट लिमिटेड यांनी कळविले असून ही मदर डेरी फ्रुट्स अँड व्हेजिटेबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने उदगीरची शासकीय दूध योजना चालवण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या या प्रयत्नामुळे उदगीर करांची कित्येक वर्षापासून ची मागणी आता पूर्णत्वास जात आहे. ही एक अत्यंत आनंदाची बाब आहे.
चौकट…….
राजकीय विचारांचे जोडे बाजूला ठेवून विकासासाठी कायम प्रयत्न करणार — खा.काळगे
उदगीर येथील शासकीय दूध योजना चालू करावी, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडे आपण सतत पाठपुरावा करून तो पुरवत चालू करण्यासाठी कायम प्रयत्न करणार आहे. विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून माझ्या मतदारसंघातील नवीन नवीन प्रकल्प निर्माण करण्यासाठी आणि जुन्या प्रकल्पांना पुनरुज्जीवीत करण्यासाठी मी सदैव प्रयत्न करणार असल्याचे विचार खा डॉक्टर शिवाजीराव काळगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
चौकट….
स्व. शंकराव चव्हाण यांनी सुरू केली होती डेरी
उदगीर जळकोट देवणी हा परिसर डोंगराळ भाग असल्यामुळे आणि सतत दुष्काळाशी सामना करणारा असल्यामुळे शेतकऱ्यांना सतत आर्थिक संकटांना सामना करावा लागत होता शेतकऱ्यांना जोडधंदा करता यावा या विचाराने तत्कालीन केंद्रीय मंत्री व शंकरराव चव्हाण यांनी उदगीर परिसरातील शेतकऱ्यांचा विचार करून हा प्रकल्प उभारण्यासाठी मोठे योगदान दिले होते.
चौकट…
एक लाख लिटर पेक्षा जास्त दुधाचे संकलन होत होते…
उदगीर येथील शासकीय दूध योजनेमध्ये जेव्हा ही योजना पूर्ण ताकतीने चालू झाली होती तेव्हा सव्वा लाखाहून अधिक लिटर दूध संकलन केले जात होते आणि भारतातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये उदगीर येथील दूध भुकटी जात होती इतकेच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणात निर्यात होत होती इतक्या मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेल्या या प्रकल्पाला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले आणि हा प्रकल्प बंद पडला.