आंतरराज्य टोळीने 30 तोळे सोन्याची चोरी केली !! एलसीबी चे पो.नि. मिरकले यांच्या पथकाने अद्दल घडवली!!
लातूर (एल. पी.उगिले) : लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एकापेक्षा एक धडाकेबाज मोहीम राबवत, आपले वर्चस्व गाजवले आहे. लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याला वेसन घालत असतानाच गुंतागुंतींचे आणि चोरीचे, घरफोडीचे गुन्हे देखील मोठ्या सिताफिने उघड करत आहेत. परवाच साखरपुड्याच्या कार्यक्रमातून दागिन्याची बॅग चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीतील अट्टल आरोपीताकडून 30 तोळे वजनाचे 09 लाख रुपयाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात या पथकाला यश आले आहे.
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस ठाणे एमआयडीसी हद्दीमधून एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात मधून काही अज्ञात आरोपींनी नजर चुकवून दागिन्याने भरलेली बॅग चोरून नेली होती. त्यावरून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे अज्ञात आरोपी विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सदरचा चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता आदेशित केले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी, अमलदारांचे विशेष पथक तयार करण्यात आले होते. सदर पथकामार्फत जिल्ह्यातील व जिल्हाबाहेरील तसेच परराज्यातील विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते.
सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रात्रंदिवस परिश्रम घेत होते. तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती.
दरम्यान विशेष पोलीस पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, सदर कार्यक्रमांमध्ये दागिने चोरणारे आरोपी हे मध्यप्रदेश मधील राजगड जिल्ह्यातील बोडा गावातील आहेत. गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे सदर माहितीची शहनिशा करून सदरची माहिती खरी असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व आमलदाराचे एक पथक मध्यप्रदेशात रवाना करण्यात आले.
सदर पथकाने लातूर पासून दोन हजार किलोमीटर दूर जाऊन मध्यप्रदेश मध्ये तब्बल आठ दिवस अहोरात्र तापास करून नमूद गुन्हयातील आरोपींचा शोध घेतला, तसेच त्यांनी चोरलेल्या मुद्देमाला बाबत अचूक व सखोल माहिती मिळवली त्या आधारे नमूद आरोपी नामे सोनू गोकुळप्रसाद सिसोदिया, (वय अंदाजे 20 वर्ष, राहणार हुलखेडी, तालुका पाचोर, जिल्हा राजगड, राज्य मध्य प्रदेश),मेहताब नथूसिंग सिसोदिया, (वय अंदाजे 25 वर्षे, राहणार कडिया, तालुका पाचोर जिल्हा राजगड मध्यप्रदेश),कालू बनवारी सिसोदिया, अंदाजे (वय 20 वर्ष, राहणार कडिया तालुका पाचोरा जिल्हा राजगड जिल्हा मध्यप्रदेश) अशांनी मिळून लातूर येथील छत्रपती चौकामधील एका हॉटेलमधील हॉलमध्ये साखरपुड्या च्या कार्यक्रमा मधून 30 तोळे सोन्याची बॅग चोरून ती एका महिला नातेवाईकाकडे लपवून ठेवल्याचे समजले. त्यावरून सदर पथकाने अतिशय कुशलतेने तपास करून नमूद महीलेकडून आरोपींनी चोरलेले 30 तोळ्याचे दागिने किंमत नऊ लाख रुपये जप्त केली आहे.
लातूर येथील पोलीस पथक गावामध्ये दाखल झाल्याची माहिती मिळताच नमूद आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. तसेच गुन्हयातील जप्त मुद्देमाल पुढील कार्यवाही करिता पोलीस ठाणे एमआयडीसी यांचे ताब्यात देण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे एमआयडीसीचे पोलीस उपनिरीक्षक राजपूत हे करीत आहेत.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड, पोलीस अमलदार राहुल सोनकांबळे, खुर्रम काझी, युवराज गिरी, मुन्ना मदने, विकास नळेगावकर, राजेश कंचे, मोहन सुरवसे, सायबर सेल चे पोलिस उपनिरीक्षक हीना शेख, पोलीस अमलदार संतोष देवडे, गणेश साठे, शैलेश सुळे यांनी केली आहे.