खा काळगे यांच्या विकासात्मक दृष्टिकोनाला साथ द्या – स्वप्निल अण्णा जाधव

0
खा काळगे यांच्या विकासात्मक दृष्टिकोनाला साथ द्या - स्वप्निल अण्णा जाधव

खा काळगे यांच्या विकासात्मक दृष्टिकोनाला साथ द्या - स्वप्निल अण्णा जाधव

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर विधानसभा मतदारसंघातील अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या शासकीय दूध योजना आणि दूध भुकटी प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनासाठी लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी सतत पाठपुरावा करून ही योजना पूर्ववत सुरू करण्यासाठी शासनावर दबाव तंत्र टाकलेले आहे. उदगीर पंचक्रोशीतील अत्यंत महत्त्वाची अशी ही लोककल्याणकारी योजना चुकीच्या प्रशासनामुळे बंद पाडली गेली. त्यानंतर ही योजना चालू करण्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे एक तपाहून अधिक काळापासून ही योजना बंदच आहे. खा. डॉ. शिवाजीराव काळगे हे पुढाकार घेत आहेत, तर उदगीर पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. असे आवाहन स्वप्निल अण्णा जाधव यांनी केले आहे.
राजकीय विचारधारा वेगवेगळ्या असू शकतात. त्या सर्व बाजूला ठेवून केवळ आणि केवळ विकासाच्या प्रश्नावर जो नेता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करतोय, त्याच्या पाठीशी सर्वांनी उभे राहणे हे नैतिक कर्तव्य आहे. असे विचार उदगीर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेले युवानेते स्वप्निल अण्णा जाधव यांनी व्यक्त केले आहे.
उदगीर परिसरामध्ये जवळपास साडेपाचशेहून अधिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प आहे. तसेच शेकडो शेतकऱ्यांना दुधाचा जोडधंदा करता यावा, आणि शेतकऱ्यांची आर्थिक बाजू सुधारावी. यादृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प आहे. अशा प्रकल्पासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे आहे.
मात्र मध्यंतरीच्या काळात वेगवेगळ्या राजकीय पुढार्‍यांचे आणि राजकीय पक्षांचे वेगवेगळे स्वार्थ पुढे आल्यामुळे ही योजना चालू व्हावी अशी राजकीय महत्त्वकांक्षा कोणत्याही पुढार्‍यांनी दाखवली नाही. त्यामुळे ही योजना धुळखात पडली. गेल्या राज्य सरकारने तर चक्क ही योजना भंगार मध्ये काढून पूर्ण सामग्री भंगाराच्या किमतीमध्ये विक्री करण्याचा निर्णय घेऊन तशा निविदाही दिल्या होत्या. उदगीरकरांच्या जागृतपणामुळे तो डाव हाणून पाडला गेला. मात्र पुन्हा तसा डाव खेळला जाणार नाही याची खात्री नाही. आज निस्वार्थ भावनेने लातूर जिल्ह्याचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे हे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नाला सर्व नागरिकांनी साथ द्यावी. असेही आवाहन स्वप्निल अण्णा जाधव यांनी केले आहे.
आपण उदगीर विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करणार आहोत. या भागातील सुशिक्षित बेकार, बेरोजगार पोटाची खळगी भरण्यासाठी मोठमोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होऊ नयेत. या दृष्टीने जे जे म्हणून करता येईल, ते ते आपण आपल्या परीने करणार आहोत. तसेच जे इतर नेते त्यादृष्टीने प्रयत्न करत आहेत, त्यांना आपण राजकीय हेवे दावे बाजूला ठेवून सहकार्य करणार असल्याचे स्वप्निल अण्णा जाधव यांनी जाहीर केले आहे. जनतेने देखील राजकीय विचारधारा बाजूला ठेवून सकारात्मक विचार घेऊन पुढे येणाऱ्या नेत्याला, कार्यकर्त्याला साथ द्यावी असेही आवाहन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *