चंदनाच्या झाडांची अवैध तोड करून 152 किलो चंदन व वाहनासह 12 लाख 8 हजाराचा मुद्देमाल जप्त
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याच्या संदर्भात सध्या लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक कठोर भूमिका घेत असून या अवैध धंद्याला प्रतिबंधित करण्यासाठी वेगवेगळी पथक नेमली आहेत. अशाच एका विशेष पथकाने चंदनाच्या झाडांची अवैध तोड करून विक्री करून फायदा घेणाऱ्या लोकांना पकडण्याच्या संदर्भात सूचना केल्या होत्या, त्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्वतंत्र पथके ही कामाला लावली होती. त्याचे एका पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत 152 किलो चंदन व वाहनासह बारा लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरिता विशेष पथकाची निर्मिती करून मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे सुचित केले आहे. त्या अनुषंगाने अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांचे मार्गदर्शनात दि.15/12/2024 रोजी मध्यरात्री विशेष पथकाला मिळालेल्या माहितीवरून बार्शी येथून औसा कडे जाणाऱ्या हायवे स्कॉर्पिओ गाडीचा पाठलाग करून औसा येथे ती गाडी पकडण्यात आली.
स्कार्पिओ गाडीमधून प्रतिबंधीत व संरक्षित चंदन वृक्षाची लाकुड चोरी करुन चोरटी विक्री करण्यासाठी घेवुन जात असताना सदर पथकाने सापळा लावून स्कार्पियो (क्रमांक एम एच 14 ए एम 6677) गाडीची तपासणी केली असता गाडी वृक्षतोड करण्यासाठी प्रतिबंधित व संरक्षित चंदनाची साल काढून तासलेला चंदनाचा गाभा व लाकडे मिळून आले.
सदर इसमास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव अशोक दिलीप कदम, (वय 30 वर्ष, राहणार येळंब तालुका बार्शी जिल्हा सोलापूर),
मारुती जेटीबा पवार, (वय 50 वर्ष, राहणार इंदिरानगर, औसा), तानाजी सुरवसे, (राहणार सावरगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर (फरार)) असे असून त्यांच्याकडून वरील कारवाई 152 किलो चंदन,स्कार्पिओ वाहन असे एकूण 12 लाख 8 हजार रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांचे फिर्यादीवरून पोलीस स्टेशन औसा येथे कलम 41,42 भारतीय वन अधिनियम 1927 व 4 महाराष्ट्र वृक्ष तोड अधिनियम, 303(2),3 (5) भारतीय न्याय संहिता प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंगद कोतवाड, पोलीस अमलदार युसुफ शेख, चालक पोलीस अमलदार दीपक वैष्णव, पोलीस स्टेशन औसाचे पोलीस अमलदार वाडकर, सूर्यवंशी यांनी ही उत्कृष्ट कामगिरी केली आहे.