स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यावर कारवाई, 5 लाख 98 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व 27 हजार रुपयाची देशी-विदेशी दारू,हातभट्टी जप्त
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याच्या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक समय मुंडे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्ह्यांविषयी शाखेने पाच लाख 98 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि 27 हजार रुपयाची देशी-विदेशी दारू व हातभट्टीची दारू जप्त केली आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित केले आहे. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक तयार करून लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत.
अवैध धंद्याची माहिती काढत असताना दिनांक 15/12/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकांनी लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी कार्यवाही करत लाखो रुपयांचा गुटखा व हातभट्टी देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्यावर कारवाई केली आहे.
यामध्ये पोलीस ठाणे विवेकानंद चौक हद्दीमधून एका स्विफ्ट डिझायर गाडी मधून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ तंबाखूजन्य पदार्थाची अवैध विक्री व्यवसाय करण्यासाठी वाहतूक करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत महाराष्ट्र शासनाने बंदी घालण्यात घातलेले वेगवेगळ्या कंपनीचे, महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले गुटखा व सुगंधित पानमसाला, वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक एम.एच. 04 जी.झेड. 4654 ) असा एकूण 5 लाख 58 हजार 485 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित पानमसाला, तंबाखूचा मुद्देमाल मिळून आल्याने ते मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची अवैधरित्या विक्री व्यवसाय करण्यासाठी वाहतूक करीत असताना मिळून आलेले इसम नामे असलम अकबरखा पठाण, (वय 39 वर्ष,राहणार साई रोड, नवरत्न नगर, लातूर), आसिफ बशीर सय्यद, (वय 33 वर्ष, राहणार सोहेल नगर, लातूर).
यांना प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची विक्री व्यवसाय करण्यासाठी वाहतूक करणे वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या कारसह ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे विवेकानंद चौक चे पोलीस करीत आहेत.
तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हाभरात वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कारवाई करत देशी-विदेशी व हातभट्टीची अवैध विक्री व्यवसाय करणारे विरुद्ध कारवाई करत 27 हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वातील पोलीस पथकांनी पार पाडली आहे.