विज्ञान वाचण्यापेक्षा अंगीकारणे हिताचे – डॉ. विश्वास सुतार
शाहूवाडी (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कमालीची सर्जनशीलता आणि कल्पकता आहे. मात्र दुर्दैवाने ग्रामीण भाग अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडला आहे. अंधश्रद्धेची विषारी बांडगुळे छाटून ग्रामीण भागाचा शाश्वत विकास करण्यासाठी विज्ञानाचा अंगीकार करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी विज्ञान दाखवणे, विज्ञान वाचणे एवढेच महत्त्वाचे नसून त्याहीपेक्षा विज्ञानाचा अंगीकार करणे महत्त्वाचे आहे. विज्ञान शिक्षकांनी स्वतःला अपग्रेड ठेवून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लावावा, असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी डॉ. विश्वास सुतार यांनी केले. करंजोशी (ता. शाहूवाडी) येथील राजा शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय व राजर्षी शाहू करिअर अकॅडमी येथे ५२ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सहायक गटविकास अधिकारी सुनील पाटील होते.
मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या, शास्त्रज्ञांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दरम्यान सहायक गटविकास अधिकारी सुनील पाटील यांच्या हस्ते फित कापून प्रदर्शन कक्षाचे अनावरण करण्यात आले.
प्राथमिक विभाग इ. ६ वी ते इ. ८ वी (७३) व (४२), माध्यमिक इ. ९ वी ते १२ वी (६४), प्राथमिक शिक्षक (११), माध्यमिक शिक्षक (८) व प्रयोगशाळा सहा. परिचर (४) अशा २०२ साधनांची नोंद झाल्याचे विज्ञान सचीव बाबूराव शिंदे यांनी सांगितले. यावेळी अनिल कांबळे निर्मित नवभारत साक्षरतेवर लघु नाटिका सादर करण्यात आली. प्रदर्शन ठिकाणी ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राजर्षी शाहू करिअर अकॅडमीचे अध्यक्ष संजय लोकरे, माध्यमिक पत संस्थेचे व्हाय. चेअरमन प्रकाश कोकाटे यांचीही मनोगते झाली. सचीव अनिल अत्तरकर, शिक्षक बँकेचे संचालक शिवाजी रोडे-पाटील, केंद्रप्रमुख सुधा पाटील, सदाशिव थोरात, कृष्णात कडू, बी. बी. कोंडावळे, शिवराम मावची, सदाशिव कांबळे, साहेब शेख, आर. एस. पाटील, दीपक लाड, उमेश नांगरे, श्याम पाटील, संजय जगताप, नामदेव पाटील, संभाजी लोहार, केशव बिरादार, भरत बोरकर, अमोल साळवे, तानाजी रेखले, मारुती शेट्टेवाड, प्रवीण भोसले, विक्रम पाटील, प्रा. विलास पाटील, वैशाली शेळके, प्रा. विकास कोकरे, प्रा. गणेश रेंदाळे-पाटील, बाबासाहेब साळुंखे आदींसह प्राथमिक व माध्यमिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रदर्शनासाठी विज्ञान कमिटीसह अन्य समितीचे पदाधिकारी, राजा शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.
प्रास्ताविक विस्तार अधिकारी दिलीप पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विजय गावडे यांनी केले. प्राचार्या वहिदा पठाण यांनी सर्वांचे आभार मानले. खुले प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील शाळांतील विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी गर्दी केली होती.