तिहार जेल मधील अंतर्गत व्यवस्थेची काळी कहाणी म्हणजे “ब्लॅक वॉरंट होय” — डॉ. शशिकला राय.
उदगीर, (एल.पी.उगीले) - आशिया खंडातील सर्वात मोठी जेल म्हणजे तिहार जेल होय. येथे अनेक महत्त्वपूर्ण अपराधी, गुन्हेगार व कुख्यात दोषी लोकांना ठेवले जाते. परंतु येथील अंतर्गत व्यवस्था आणि बोकाळलेला भ्रष्टाचार यामुळे येथे घडणारे कित्येक लाजिरवाणी प्रकार, रहस्य, आश्चर्य यामुळे जेलमधील जनजीवन, अनेक वर्षे सडणारे हजारो कैदी यांच्या बाबतच्या न्यायव्यवस्थेची काळी कहाणी म्हणजे ब्लॅक वॉरंट ही कादंबरी होय, असे मत डॉ. शशिकला राय यांनी व्यक्त केले.
डॉ. रजनी रणपिसे , पुणे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या 327 व्या वाचक संवाद मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे हिंदी विभागात कार्यरत असणाऱ्या प्रसिद्ध साहित्यिका तथा परखड वक्त्या डॉ. शशिकला राय यांनी सुनील गुप्ता व सुनेत्रा चौधरी लिखित ‘ब्लॅक वॉरंट’ या तिहार जेलमधील अंतर्गत व्यवस्थेच्या अभ्यासपूर्ण हिंदी साहित्य कृतीवर संवाद साधताना पुढे म्हणाल्या की, वाढत्या अपेक्षांमधून होणारा भ्रष्टाचार हा आठव्या आश्चर्यासारखा असून एखाद्याचे सुख म्हणजे दुसऱ्यांचे दुःख बनत आहे, आणि न्यायाला लंगडे बनवत आहे. तिहार जेल बद्दल सर्वत्र चर्चा होते, परंतु आतील विश्वही आश्चर्यकारक आहे. आत मध्ये होणाऱ्या मानवाधिकार्यांच्या अंदाधुंद उल्लंघणामुळे जेलमधील भोजन, विकृत जेलकर्मी, न्यायालयाचे आदेश त्यांची होणारी पायमल्ली या सर्व विवादित बाबीवर या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे.
यावेळी तुळसीदास बिरादार , मोहन निडवंचे, मुरलीधर जाधव, वीरभद्र स्वामी व मैनाताई साबणे यांचेसह अनेकांनी चर्चेत सहभाग नोंदवला.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ. रजनी रणपिसे म्हणाल्या की, विश्वातील मोठ्या जेलमध्ये डांबले जाणारे कैदी त्यांच्याबरोबरचे भेदभाव, पूर्ण व्यवहार आणि अधिकाऱ्यांची जिंदगी याबद्दल खूप सुंदर भाष्य संवादकानीं केले असून हा वाचक संवाद म्हणजे सर्वार्थाने बौद्धिक खुराक देणारा आहे. असा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर राबवला जावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
शासकीय दुध डेअरीच्या सभागृहात संपन्न झालेल्या चला कवितेच्या बनात अंतर्गतच्या या वाचक संवादचे सूत्रसंचालन संयोजक अनंत कदम यांनी केले, संवादकांचा परिचय प्रा.बालाजी सूर्यवंशी यांनी करून दिला तर आभार प्रा.गोपाळ पाटील यांनी मानले.