महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सबलीकरणात पशुसखी प्रशिक्षण दिशादर्शक – डॉ. नंदकुमार गायकवाड
उदगीर (एल.पी.उगीले)
शेळीपालनाशी निगडीत बचत गटाच्या महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी आणि सामाजिक स्तर उंचावण्यासाठी महाविद्यालयामार्फत देण्यात येत असलेल्या प्रशिक्षणातून पशुसखीची क्षेत्रिय भूमिका अधिक धारदार होईल. असे अध्यक्षीय स्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड यांनी आपले मत प्रकट केले.
प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी माविम लातूरचे सहाय्यक जिल्हा समन्वय अधिकारी दीपक टेकाळे, प्रकल्प सह-समन्वयक डॉ. नरेंद्र खोडे आणि हितन कुऱ्हे, माविम प्रकल्प सल्लागार, लातूर हे उपस्थित होते. डॉ. गायकवाड आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की, पशुसंगोपनात महत्वाची भूमिका बजावित असून सुद्धा ग्रामीण महिला विस्तार उपक्रमापासून आणि त्यातून मिळणाऱ्या वैज्ञानिक माहिती, तंत्रज्ञान आणि कौशल्यापासून उपेक्षित राहतात. त्यांना प्रशिक्षित केले तर नवतंत्राचा प्रसार आणि गोठयातील नवतंत्राचा उपयोग वाढेल. नवतंत्राचा उपयोग केल्यास उत्पादकता आणि उत्पादन वृद्धिंगत होईल. माविम पुरस्कृत प्रकल्पाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या चळवळीत आमच्या महाविद्यालयाला या निमित्य कार्य करण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे, त्याचा आयोजन समितीने आणि पशुसखीने परिपूर्ण उपयोग करून घ्यावा, असे आवाहन केले.
वर्ष २०२३-२४ आणि २०२४-२५ मध्ये लातूर, बीड, नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यातील एकूण १४५ पशुसखीना प्रथम टप्प्यात प्रशिक्षण पूर्ण करून गेल्या आहेत. त्यापैकी दि. २३ ते २७ डिसेंबर दरम्यान आयोजित या निवासी पहिल्या पाच दिवसीय प्रशिक्षणात लातूर जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून माविमतर्फे निवडलेल्या ३० पशुसखी महिला सहभागी झालेल्या आहेत. प्रकल्प सहसमन्वयक डॉ. नरेंद्र खोडे यांनी प्रास्ताविकात प्रशिक्षणाची रूपरेषा मांडली.
सूत्रसंचालन डॉ. राम कुलकर्णी, प्रशिक्षण सह-समन्वयक यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. मत्स्यगंधा पाटील, प्रशिक्षण सह-समन्वयक यांनी केले. प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी प्रशिक्षण समन्वयक डॉ. शरद आव्हाड, तसेच आयोजन समिती समवेत पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. संकेत नरवाडे, डॉ. अय्यन पाटील, डॉ. वेदान्त पांडे, डॉ. सुहासिनी हजारे, डॉ. विनोद जाधव, डॉ. साहिल सय्यद, डॉ. ओम होळकर, डॉ. वेंकटेश चव्हाण यांनी अथक मेहनत घेतली. प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.