सहकार से समृद्धी’ अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे २५ डिसेंबर रोजी आयोजन; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची उपस्थिती
अहमदपूर (गोविंद काळे) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘सहकार से समृध्दी’ अंतर्गत बहुद्देशीय प्राथमिक सहकारी संस्था, दुग्धव्यवसाय व मत्स्यपालन सहकारी संस्था स्थापन करून सर्व ग्रामपंचायत व गावांना समाविष्ट करण्याची योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत एकूण दहा हजार प्राथमिक सहकारी संस्था स्थापन झाल्या असून त्यापैकी सहा हजार संस्था दुग्ध व्यवसायाशी निगडीत आहेत. ही उपलब्धी साजरी करण्यासाठी २५ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथील आयसीईआर कन्व्हेंशन सेंटर येथे विशेष समारंभ होत आहे. या अनुषंगाने लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीडीसी सभागृहात २५ डिसेंबर रोजी दुपारी १.३० ते सायंकाळी ५ दरम्यान विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यावेळी उपस्थित राहणार आहेत.
स्थानिक खासदार, आमदार यांच्यासह सहकार आयुक्त व निबंधक दीपक तावरे, स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, जेडब्ल्यूसीचे सभासद, स्थानिक प्राथमिक सहकारी संस्थांचे पदाधिकारी व सचिव, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पदाधिकारी, पीएसीएसचे सचिव, संचालक मंडळ, दुग्ध उत्पादक सहकारी संस्था आणि मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचे, संघाचे प्रतिनिधी आणि संचालक या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.