शासन तळेगाव येथील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
अहमदपूर (गोविंद काळे) : एका व्यक्तीने वक्फ ट्रिब्यूनलमध्ये दावा दाखल करून अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील जवळपास १०० शेतकऱ्यांना जमिनीच्या ताब्याविषयी नोटीस बजावली आहे. या प्रकरणामुळे चिंतीत असलेल्या शेतकऱ्यांशी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी, आमदार अभिमन्यू पवार यांनी तळेगाव येथे जावून संवाद साधला. या प्रकरणातील जमिनी वक्फ बोर्डाच्या मालकीच्या नसल्याने बोर्डाने या जमिनींवर कोणताही हक्क सांगितलेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावे, असे वक्फ बोर्डाचे अध्यक्ष काझी यांनी सांगितले. तसेच या प्रकरणात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असे ना. पाटील व आ. पवार यांनी सांगितले.
नोटीसा बजावलेल्या जमिनीची नोंद गॅझेटनुसार वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनींच्या नोंदीमध्ये नसल्याने वक्फ बोर्डाने दावा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तरीही शेतकऱ्यांमध्ये वक्फ बोर्डाबाबत गैरसमज निर्माण झाल्याने गावामध्ये शेतकऱ्यांसमोर भूमिका मांडण्यासाठी आलो असल्याचे काझी यावेळी म्हणाले. तसेच या प्रकरणात शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली. प्रारंभी तळेगाव येथील सेवानिवृत्त प्राचार्य रमेश दापके, उपसरपंच ज्ञानेश्वर शेळके यांनी शेतकऱ्यांना आलेल्या नोटीसांबद्दल सविस्तर माहिती दिली.