सामाजिक शास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनातील न्यूनगंड बाहेर काढून टाकणे आवश्यक – प्रा. सायली समुद्रे
लातूर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागातर्फे “सामाजिक शास्त्राची उपयोगिता” या विषयावर एक दिवसीय वेबिनार आयोजित करण्यात आला. या वेबिनार मध्ये राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सायली समुद्रे या साधन व्यक्ती म्हणून उपस्थित होत्या. वेबिनार च्या अध्यक्षपदी दयानंद कला महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाड उपस्थित होते.
सामाजिक शास्त्राची उपयुक्तता या विषयावर मार्गदर्शन करत असताना प्रा. सायली समुद्रे म्हणाल्या की, सामाजिक शास्त्रातील विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम मनातील न्यूनगंड बाहेर काढला पाहिजे की, या क्षेत्रात आपले करिअर होऊ शकत नाही. या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना इंडियन सिविल सर्विसेस, कायदा, न्याय, पोलीस, समुपदेशन ,अध्यापन अशा विविध क्षेत्रात भरपूर संधी आहेत. मात्र वेळे आधीच त्याची माहिती करून घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता वाढवणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. अंजली जोशी यांनी या विषयाचे महत्त्व विशद केले. त्याच प्रमाणे दयानंद कला महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाने नेहमीच समाजशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची नाळ समाजाशी जोडण्याचा केलेला प्रयत्न त्यांनी यावेळी अधोरेखित केला. त्यांच्या मते, चार भिंतींच्या पलीकडे जाऊन समाजातील समस्या विद्यार्थ्यांना जवळून समजून घेता याव्यात यासाठी समाजशास्त्र विभागाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. विद्यार्थ्यांना घेऊन वृद्धाश्रमाला दिलेली भेट असो वा रिमांड होम मध्ये किंवा अनाथ मुलांच्या वसतिगृहात किंवा एड्सग्रस्त पालकांची मुले जिथे संभाळली जातात अशा सेवालयात दिलेली भेट असो, ज्यामुळे विद्यार्थी या समस्या भावनिक दृष्टिकोनातून समजून घेऊ शकतात. त्याशिवाय समाजशास्त्र विभागातर्फे विद्यार्थ्यांचे सातत्याने समुपदेशन करण्याचेही काम केले जाते असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना प्र प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड म्हणाले की जीवनाच्या सर्वच क्षेत्रात सामाजिक शास्त्राचे विद्यार्थी आढळतात. ही सर्वउपयोगी शाखा आहे. योग्य वेळी विद्यार्थ्यांना करियर बाबत कौन्सिलिंग मिळाल्यास कला शाखेतून सुद्धा ते खूप उंच भरारी घेऊ शकतात. त्यामुळे अशा करिअर मार्गदर्शन करणाऱ्या कार्यक्रमांची आज गरज आहे.
या वेबिनार मध्ये नीलकंठ पुजारी या माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, दयानंद कला महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागाने आयोजित केलेल्या अशाच एका करियर गायडन्स या कार्यक्रमा मुळेच मी आज पुणे विद्यापीठामध्ये शिक्षण घेऊ शकत आहे. मराठवाड्यातील विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पदवी नंतर पुढे काय करावे हे नेमके समजत नाही. विविध कोर्सेसची माहिती आणि प्रवेश क्षमता त्यांना अशा कार्यक्रमांमधून समजून घेता येऊ शकतात.
या वेबिनार मध्ये विद्यार्थ्यांनी सामाजिक शास्त्रातील संधींबाबत चर्चा केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. बी.बी. आदमाने यांनी केले.