पालकांनी वर्तनात विवेक दाखवल्यास मुले आपोआपच शिकतील – डॉ. मिलिंद पोतदार
लातूर (प्रतिनिधी) : “पाल्याच्या जडणघडणीत आपली भूमिका काय असायला हवी हे आपण नीट समजून घेण्याची गरज आहे. पालकांनी पाल्यासोबत राहून आत्मपरीक्षण केल्यास त्यांना स्वतःची भूमिका समजू शकेल. पालकांनी वर्तनात स्वत: विवेक दाखवल्यास मुले आपोआपच शिकतील. मुलांना नालस्ती व तुच्छतादर्शक विशेषणं न लावता त्याचे वर्तन चुकीचे आहे एवढेच त्याला सांगितले पाहिजे.” असे मत प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मिलिंद पोतदार यांनी व्यक्त केलं. येथील श्रीकिशन सोमाणी विद्यालयात आयोजित केलेल्या यु ट्यूब संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.संवादाचा विषय होता “ऑनलाईन शिक्षणातील पालकत्व”. मुलांना घडवणं हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे असं प्रत्येक पालकांना वाटत असतं, पण त्यातली पहिली पायरी म्हणजे स्वतः घडणं. या प्रक्रियेकडे दुर्लक्ष झालं की मुलांना घडवता येत नाही.
मूल शिकतं म्हणजे नेमकं काय? हे आपण समजून घेऊया. एका बाजुला तो पुस्तकी ज्ञान घेत असतो आणि दुसऱ्या बाजुला त्याचे कुटुंब, कुटुंबातील वातावरण,अनुभव,कुटुंबाकडून जन्मजात मिळालेले संचित, संस्कार या साऱ्यामधून त्याचे जीवनशिक्षण होत असते. माणूस म्हणून घडायला,त्याच्या व्यक्तित्वाचा ठसा उमटवायला हे जीवन शिक्षण उपयोगी असते.
मूल जास्तीत जास्त घरातल्या लोकांकडून शिकत असतं. त्यासाठी पालक म्हणून आपली भूमिका काय असायला हवी हे समजून घेतलं पाहिजे.
मुलांच्या जडणघडणीत पालकांना वेगवेगळ्या भूमिका बजावायच्या असतात.पहिली भूमिका प्रोटेक्टर (संरक्षक) म्हणून. त्याची शारीरिक, मानसिक,सामाजिक सुरक्षितता जपणे. दुसरी भूमिका इन्स्ट्रक्टर(सूचना देणारा) म्हणून. त्याला वेळोवेळी सूचना देऊन, धोके समजावून सांगणे. तिसरी भूमिका रोल मॉडेलिंग( आदर्श ठेवणारा) आपल्या वागण्यातून,कृतीतून मूल खूप सारं शिकत असतो त्यासाठी आपलं वागणं कसं असायला हवं हे आपण ठरवलं पाहिजे.एज्युकेटर(शिक्षक) शिक्षकाच्या भूमिकेतून काही गोष्टी शिकवाव्या लागतात. मोटिव्हेटर(प्रोत्साहन देणारा) त्याच्या वाटचालीत,प्रगतीत सातत्याने प्रोत्साहन द्यावे लागेल. गाईड( मार्गदर्शक) योग्य काय, अयोग्य काय याची जाणीव करून द्यावी लागते.
सगळ्यात महत्त्वाची भूमिका सपोर्टरची.मी तुझ्या पाठीशी आहे याचा विश्वास सातत्याने दिला पाहिजे. सध्याच्या कोरोनाच्या आपत्तीत तर या भूमिका आपण जेवढ्या उत्तम रितीने बजावू तेवढे आपल्या पाल्याचे व्यक्तिमत्त्व चांगले घडण्यास मदत होणार आहे. करोनाचे संक्रमण ही आपत्ती आहे. या आपत्तीमुळे आपल्या जीवनशैलीवर परिणाम झालाय. पण या काळात ऑन लाईन शिक्षणाचा सुंदर पर्याय आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलाय. ही एक चांगली संधी आहे.या पर्यायात अडचणी निश्चितच आहेत पण ती आपत्ती नाही हे सर्वांनी समजून घ्यायला हवे.
अडचणींवर आपण मात करू शकतो. परिस्थितीचा स्विकार करून ठाम,निर्धाराने, धैर्याने तोंड कसं द्यायचं याचं शिक्षण आपल्या मुलांना देण्याची पालकांची जबाबदारी आहे असे पोतदार सर म्हणाले.
पालक म्हणून आपल्या मुलांबरोबर आपला नियमित संवाद व्हायला हवा. हा दोन्ही बाजुंनी व्हायला हवा.मुलांचे म्हणणे ऐकत असताना कोणत्याही गोष्टी गृहित धरून आपण बोललो तर योग्य होणार नाही. आपली देहबोली, आपले उच्चार, शब्दाचा वापर या साऱ्याचे भान आपल्याला असायला हवे.तुमच्या संवाद साधण्यात जिव्हाळा, आपुलकी हवी. मुलांवर रागावणे, चिडणे असूच नये असे नाही. पण रागावण्याची पध्दत योग्य हवी.आपल्या मुलांच्या वर्तनाच्या चुका दाखवा पण त्याच्या व्यक्तित्वावरच बोट ठेवले तर एक तर तो आत्मविश्वास गमावून बसेल नाही तर बंडखोर होईल. मुलांच्या कृतीबाबत मूल्यमापन नको तर काय होतंय आणि त्याचा परिणाम काय हे समजावून सांगितले पाहिजे.
सध्याच्या वातावरणाचा मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होत आहे.संवादाच्या माध्यमातून परिस्थितीबद्दल योग्य पद्धतीने त्यांच्याशी बोलता आलं पाहिजे. मुलांबरोबर आपला संवाद वाढण्याची गरज असल्याचे पोतदार सरांनी सांगितले. करोनाचा काळ आणि ऑन लाईन शिक्षण हा आपल्या आयुष्यातील एक टप्पा आहे. त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले तर मुलांचे खूप सारे प्रश्न सुटतील. असे डॉक्टर पोतदार म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिनव मानव विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. चेतन सारडा यांनी केले. सूत्रसंचालन भारती गोवंडे यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे सचिव कमलकिशोर अग्रवाल, कोषाध्यक्ष जयेश बजाज, मार्गदर्शक सदस्य अतुल देऊळगावकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक श्री. रमाकांत स्वामी,पर्यवेक्षक श्री. गिरीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संगणक विभागाचे मनोज मुंदडा, अमोल माने आणि राहूल पांचाळ तसेच शिक्षक वृदांनी परिश्रम घेतले.