शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची सुरक्षा वाढवावी – मराठवाडा पालक संघाची मागणी

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची सुरक्षा वाढवावी - मराठवाडा पालक संघाची मागणी

लातूर (प्रतिनिधी) : राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहेत. एक आदर्श शिक्षणमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असून शिक्षण क्षेत्राला त्यांची खूप गरज आहे. हिंगोलीच्या पालकमंत्री असल्याने त्या दोन दिवसांपूर्वी हिंगोली दौर्‍यावर गेल्या असता, त्यांच्या वाहनाला टेम्पोने धडक दिली. सुदैवाने यात त्यांना कसलीही दुखापत झाली नाही. तरीही भविष्यात दुर्दैवाने कसलाही अनूचित प्रकार घडू नये यासाठी ना. वर्षा गायकवाड यांच्या सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी मराठवाडा पालक संघाच्यावतीने अध्यक्ष डॉ. भारत घोडके व सचिव प्राचार्य डी. एन. केंद्रे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राज्याचा शैक्षणिक दर्जा आणखीन कसा वाढेल यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या पुढाकार घेत असून त्यांचे कार्य उल्लेखनीय असे आहे. मागच्या काळात कोरोनाने राज्यभरात थैमान घातले होते. अशा कोरोना काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये हा उदात्त हेतू डोळ्यांसमोर ठेवून ना. गायकवाड यांनी ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरु केली. याबाबत त्या वेळोवळी त्यांनी शिक्षण संचालक, अधिकारी व संस्थाचालक यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संपर्क साधला व ऑनलाईन शिक्षण प्रणालीबाबत येणार्‍या अडचणींची सोडवणूक केली. विना अनुदानित शिक्षकांना अनुदान दिले. आगामी काळातही विद्यार्थ्यांना कसलीही अडचण येवू न देता त्यांचे शिक्षण पूर्ववत करण्यासाठी त्यांनी नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे. त्यामुळे खर्‍या अर्थाने राज्यातील शिक्षण क्षेत्राला ना. वर्षा गायकवाड यांची गरज आहे. हिंगोलीच्या पालकमंत्री म्हणूनही त्या अतिशय उत्तम कामगिरी बजावत आहेत. मात्र, दोन दिवसांपूर्वी ना. गायकवाड हिंगोली दौर्‍यावर गेल्या असता, बैठका व इतर शासकीय कार्य उरकून त्या पुढे रवाना होण्यासाठी निघाल्या तेव्हा त्यांच्या वाहनाला टेम्पोने पाठीमागून धडक दिली. सुदैवाने यात त्यांना कसलीही इजा झाली नाही. तरीही भविष्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्यांची सुरक्षा वाढवावी, अशी मागणी मराठवाडा पालक संघाचे अध्यक्ष डॉ. भारत घोडके व सचिव तथा लातूर जिल्हा संस्थाचालक संघाचे कोषाध्यक्ष प्राचार्य डी. एन. केंद्रे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

About The Author