केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला – विजय निटुरे

केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला - विजय निटुरे

उदगीर (एल.पी.उगिले) : केंद्र सरकारने अच्छे दिन च्या नावाने सत्ता मिळवली, मात्र त्यानंतर गोरगरीब जनतेला वाऱ्यावर सोडून महागाईचा भस्मासुर त्यांच्या पाठीमागे लावला. अशी कडक प्रतिक्रिया युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयभैय्या राजेश्वर निटुरे यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारच्या महागाईच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध सायकल रॅली काढली होती. सायकल रॅलीला संबोधून ते बोलत होते. संपूर्ण देशात आता केंद्र सरकारच्या विरोधामध्ये संतापाची लाट उसळली आहे. पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅसच्या दरात सातत्याने वाढ होत चाललेली आहे. वारंवार इंधनाचे दर वाढत असल्याने महागाई दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशात अगोदरच कोरोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर लावलेल्या सततच्या लाॅकडाऊन मुळे सर्व व्यवहार ठप्प आहेत. अनेकांचे उद्योग धंदे बंद झाले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेलेले आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्य माणसांना जगणे असह्य झालेले आहे. केंद्र सरकारने पेट्रोल – डिझेल आणि घरगुती गॅसचे दर तात्काळ कमी करून महागाई नियंत्रणात आणावी. अशीही मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने युवा नेते विजय भैया राजेश्वर निटुरे यांनी केली आहे.

काँग्रेस पार्टीच्या वतीने इंधनवाढीच्या विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ शहरातून सायकल रॅली काढण्यात आली, यावेळी उपजिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. निवेदनात केंद्रातील भाजप सरकारने महागाई कमी करण्याचे खोटी आश्वासने देऊन जनतेला फसवले आहे. भाजपच्या काळात पेट्रोल-डिझेल नी 100 आकडा पूर्ण केला आहे. घरगुती गॅसच्या दरात सतत वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांचे बजेट कोसळले आहे. वारंवार इंधन दरवाढ होत असल्याने याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढविल्या जात आहेत. हातावर पोट असणाऱ्या कामगारांची उपासमार होण्याची वेळ आली आहे. अशा बिकट परिस्थितीत जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. हे तात्काळ कमी करावेत. अन्यथा काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशाराही सदरील निवेदनात देण्यात आला आहे.

केंद्र शासनाच्या विरोधात काढण्यात आलेल्या सायकल यात्रेमध्ये युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयभैया राजेश्वर निटुरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष मंजूर खाॅं पठाण, विधानसभा युवक अध्यक्ष अमोल कांडगिरे, पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले, मधुकर एकुर्केकर, अमोल घुमाडे, विजय चवळे, बालाजी पाटील, अनिल मुदाळे, शिवाजी देवनाळे, माधव कांबळे, नंदकुमार पटणे, लक्ष्मण सोनवळे, धनाजी मुळे, संतोष वळसने, ज्ञानेश्वर भांगे, रविकांत पाटील, महेंद्र पाटील, राहुल सातापुरे यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author