आधुनिक भारताच्या कृषी व शैक्षणिक क्रांतीचे जनक पंजाबराव देशमुख – डॉ.डी. डी.चौधरी
अहमदपूर (गोविंद काळे) : स्वातंत्र्यपूर्व काळात १९३६ ला शिक्षण मंत्री म्हणून तर स्वातंत्र्योत्तर काळात भारताचे पहिले कृषिमंत्री म्हणून डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्यामुळे कृषी व शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आली,असे स्पष्ट प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डी. डी.चौधरी यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पंजाबराव देशमुख जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते. तर उपप्राचार्य डॉ. डी.डी. चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच या कार्यक्रमाप्रसंगी भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी दुःखद निधन झाल्याबद्दल त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माजी पंतप्रधान स्वर्गीय डॉ. मनमोहन सिंग यांना भारतरत्न प्रदान करण्यात यावा असा ठराव सर्वानुमती मंजूर करण्यात आला.
पुढे बोलतांना उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शेतीपूरक विविध उपक्रम त्यांनी सुरू केले स्वातंत्र्यानंतर सर्वप्रथम शेतकऱ्यांची कर्जमाफी करून शेतकऱ्यांचे जीवन सुजलाम सुफलाम करण्याचे कार्य त्यांनी केले. तसेच बहुजन समाजामध्ये शैक्षणिक क्रांती घडवून आणण्याचे कार्य शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख यांनी केले, असे ही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोपप्रसंगी प्राचार्य वसंत बिरादार पाटील यांनी डॉ. पंजाबराव देशमुख तसेच माजी पंतप्रधान स्वर्गीय डॉ. मनमोहन सिंग यांच्या जीवन व कार्य व प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांनी मानले. यावेळी प्रो. डॉ. नागराज मुळे, डॉ.प्रशांत बिरादार, डॉ. प्रकाश चौकटे, ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, डॉ. सचिन गर्जे, डॉ. संतोष पाटील, प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंद्रकांत धुमाळे, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.