सूर्यकांत शिरसे यांनी मराठवाड्यात ग्रंथालय चळवळ गतिमान केली – दिनेश पाटील
उदगीर (प्रतिनिधी) : मराठवाड्यामध्ये ग्रामीण भागात फिरून ग्रंथालय स्थापन करणे, ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे. अशा पद्धतीच्या कामाला प्राधान्य देऊन ग्रंथमित्र सूर्यकांत शिरसे यांनी ग्रंथालय चळवळ आणि वाचन संस्कृतीला गती दिली. असे विचार महाराष्ट्र ग्रंथालय सेनेचे मराठवाडा विभाग प्रमुख दिनेश पाटील तिवटग्याळकर यांनी व्यक्त केले. ते ग्रंथमित्र सूर्यकांत शिरसे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित सत्कार समारंभात बोलत होते.
या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार एल. पी. उगिले, प्रा. रंगनाथ कुंटे अण्णा, पोलीस संदेश रिपोर्टरचे संपादक सुरेश बोडके, कमलाबाई शिवनगे वाचनालयाचे सचिव तथा दैनिक वास्तव वेध चे तालुका प्रतिनिधी रामेश्वर बिरादार नागराळकर, सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष तथा भारतीय जनता किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण फुलारी (भालके), पांडुरंग कोनाळे, छगन पाटील, प्रकाश उर्फ बाळू पाटील, दयानंद पाटील, चंद्रशेखर ढगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना दिनेश पाटील म्हणाले की, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्त्यांना गेल्या दहा वर्षापासून मोठा संघर्ष करावा लागतो आहे. अत्यंत तोकड्या मानधनावर काम करणाऱ्या चळवळीतील कार्यकर्त्यांना वेळेवर मानधन मिळत नाही, उलट गाव पातळीवर गाव पुढार्याकडून त्रास दिला जातो. शासनाच्या पातळीवरून देखील ग्रंथालयाचे आणि ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवले जात नाहीत. यासाठी ग्रंथमित्र सूर्यकांत शिरसे यांनी गेल्या तीस वर्षापासून या चळवळीत निस्वार्थ भावनेने काम करून ग्रंथालयाचे प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न केले आहेत. चळवळीसाठी जगणार्या अशा कार्यकर्त्याला उदंड आयुष्य लाभावे. अशा शुभेच्छा देताना त्यांनी महा विकास आघाडी कडून ग्रंथालयाचे प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासनही दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर बिरादार नागराळकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन लक्ष्मण फुलारी यांनी केले.