शेतकरी संघटनेचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयास कुलूप ठोको आंदोलन
लातूर (प्रतिनिधी) : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत लाभधारक असणाऱ्या शेतकऱ्यांना नियमबाह्य व्याज आकारणी तसेच वसुली नंतरही कर्जमुक्तीचा लाभ मिळत नसल्याने शेतकरी संघटनेच्या वतीने संपूर्ण कर्जमुक्तीसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयास कुलूप ठोकून आंदोलन करण्यात आले.जिल्हा उपनिबंधकांनी त्यासंदर्भात कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
जिल्ह्यातील काही बँकांनी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभधारकांच्या कर्जावर नियमबाह्य व्याज आकारणी करत रकमा वसूल केल्या. या लाभधारकांना पुन्हा कर्ज वाटपही केले नाही, अशा अनेक तक्रारी करण्यात आलेल्या होत्या. यासंदर्भात राजेश सोळंके, महेश सोळंके, नरसिंग जाधव,ज्ञानेश्वर सगर, चंद्रकांत पाटील, प्रल्हाद बरकते यांच्यासह असंख्य शेतकऱ्यांनी त्या-त्या बँकांकडे तसेच जिल्हा अग्रणी बँकेकडे तक्रारी नोंदवल्या होत्या. विशेषतः आयसीआयसीआय बँक व ओरिएंट बँकेच्या शाखांकडून कर्जमुक्ती योजनेतील लाभधारकांवर अन्याय केला जात असल्याचे संघटनेचे म्हणणे होते.
अनेक शेतकरी चालू बाकीत असताना त्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा सरकारने केलेली होती.अनुदान तर मिळालेच नाही पण वसुलीसाठी बॅंकांनी तगादा लावला. त्यामुळे बुधवारी (दि.१४ जुलै )सकाळी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कुलुप ठोको आंदोलन केले.यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आंदोलनानंतर जिल्हा उपनिबंधकांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना लेखी पत्र देवून या दोन्ही बँका जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या कार्यकक्षेत येत नसल्याचे सांगितले. कर्जवाटप व कर्जमाफीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेनंतर याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना एक महिन्याच्या आत देण्यात येतील.कर्जमाफीपासून वंचित ठेवण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी संघटनेने दिली तर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून पुढील कार्यवाही तात्काळ करण्यात येईल, असे आश्वासनही या पत्राद्वारे देण्यात आले.
शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मदन सोमवंशी, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात उपाध्यक्ष बाबाराव पाटील, युवा कार्याध्यक्ष बालाजी जाधव, शिरूर अनंतपाळ तालुका अध्यक्ष किशनराव शिंदे, देवणी तालुकाध्यक्ष केशव धनाडे,उदगीर तालुका अध्यक्ष कालिदास भंडे, रेणापूर तालुकाध्यक्ष समाधान क्षिरसागर, विठ्ठल संपते,दगडू पडीले, विठ्ठल गोरे, तुकाराम आळंदकर, विलास आळंदकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.