जीवनात अशक्य असे काहीच नाही – वंदना फुटाणे
लातूर (एल.पी.उगीले) : जीवन सुंदर आहे, ते प्रमाणिकपणाने जगत राहिलो तर गुलाबाच्या पाकळ्याप्रमाणे उमलत जाते. ते पूर्ण उमलल्यानंतर त्याची सुंदरता अधिक दिसते. परंतु खडतर जीवनाचा प्रवास पार केल्याशिवाय हे शक्य नाही. खरंतर जीवनात अशक्य असे काहीच नाही, असे प्रतिपादन लातूरच्या जिल्हा परिषद प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी केले. लातूर येथील महालक्ष्मी गर्ल्स हॉस्टेल मध्ये आयोजित हळदी-कुंकू व नीट परीक्षा मार्गदर्शन या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महालक्ष्मी गर्ल्स हॉस्टेलच्या संचालिका मैथिली कुमार होत्या. यावेळी जयश्री पवळे, कालिका चिखले, सुमित्रा पाटील, उषा कोराटे, ज्योती भोसले, हर्षदा आदींची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, सन १९९५-९६ ला परभणी येथील शासकीय अध्यापक महाविद्यालयात शिकताना मी मेरा नाम जोकर मधील राजकपूरची जोकरची भूमिका साकारली होती. अगदी त्यानुसारच मी जीवनाच्या रंगछटा उलगडून दाखविल्या होत्या. आम्ही चार बहिणी व दोन भाऊ, वडिलांना पॅरालिसिस झालेला, घरात अठरा विश्व दारिद्रय, त्यामुळे सर्व जिम्मेदारी माझी आई व आम्हा बहिणीवर. भावांचे शिक्षणही पूर्ण करायचे होते. म्हणून आम्ही मेस चालविली, पंधरा रुपये रोजंदारीवर काम केले, शिवण काम केले, काज-गुंड्या केल्या. आयुष्य आम्हाला हरवण्याचा प्रयत्न करीत होते परंतु आम्ही आयुष्याला हरवायचे ठरविले होते. जीवन ही परीक्षा आहे. माणूस म्हणजे जोकरप्रमाणे आहे. त्याला जीवनात अनेक भूमिका वटवाव्या लागतात. परीक्षा कोणतीही असू दे. त्याला धैर्याने सामोरे गेले तर यश आपलेच असते. सर्व संकटावर मात करत-करत मी जिद्दीने लढत राहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे मी खरच १८-१८ तास अभ्यास केला आणि एमपीएससी परीक्षा पास झाले. आज तुमच्यापुढे शिक्षणाधिकारी म्हणून उभी आहे. संकटे सर्वांच्याच वाट्याला येतात. कोणाची दिसतात कोणाची दिसत नाहीत. नीटच्या विद्यार्थिनींना संदेश देताना त्या म्हणाल्या, तुम्हाला विश्वास बसणार नाही मी बॅकबेंचर होते. मला दहावीला ४८ टक्के, बारावीला ५६ टक्के होते. मात्र बी. एड. ला विद्यापीठात पाचवी आले तर एमपीएससी परीक्षेत गोल्ड मेडल मिळविल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुभाष कुमार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. तानाजी भोसले व सहशिक्षक अंगद पवळे तर आभार कविवर्य प्रा. देवदत्त मुंडे यांनी मानले. यावेळी बहुसंख्येने महिला व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.