कवीच्या जीवनाचं गाणं असते कविता – डॉ. मारोती कसाब
महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतली प्रकट मुलाखत
अहमदपूर (गोविंद काळे) : कविता आभाळातून पडत नसते आणि मातीतूनही उगवत नसते; तर ती कवीच्या प्रत्यक्ष जगण्यातून सहजपणे, उत्कटतेने आणि उत्स्फूर्तपणे येत असते. कविता म्हणजे दुसरे तिसरे काही नसून कवीच्या जगण्याचे गाणे असते, असे प्रतिपादन डॉ. मारोती कसाब यांनी केले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त येथील महात्मा फुले महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘ प्रकट मुलाखत ‘ कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शीघ्र कवी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, कार्यालयीन प्रमुख श्री. प्रशांत डोंगळीकर यांची यावेळी विशेष उपस्थित होती.
यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना डॉ. कसाब यांनी मनमोकळेपणाने आणि दिलखुलासपणे उत्तरे दिली. यावेळी त्यांनी आपली वैयक्तिक, कौटुंबिक, शैक्षणिक आणि साहित्यीक जडणघडण सांगितली. त्याचबरोबर वाचनाच्या छंदाचीही माहिती दिली. ‘ मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे’ या माधव कोंडविलकरांच्या पुस्तकामुळे आपल्याला वाचनाची गोडी लागली, असेही ते यावेळी म्हणाले. तसेच ‘पोरगं शेकत बसलंय’ या आपल्या पहिल्या काव्यसंग्रहाची निर्मितीप्रक्रियाही त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडून दाखविली. तसेच विद्यार्थ्यांच्या आग्रहाखातर त्यांनी आपल्या विविध कवितांचे सादरीकरणही केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, साहित्य हे परिस्थितीचे अपत्य असून, परिस्थितीला वळण देण्याची ताकद ज्या साहित्यात असते तेच साहित्य अजरामर होते. मराठीला प्रबोधनाची प्रचंड परंपरा लाभलेली असून, या परंपरेत मारोती कसाब यांच्या कवितेची नोंद घ्यावी लागते. जीवनातील धगधगते वास्तव म्हणजे मारोती कसाब यांची कविता होय, असेही ते यावेळी म्हणाले.
या मुलाखतीमध्ये ऋतुजा सोनवणे, तेजश्री केजकर, शिवकन्या पुठ्ठेवाड, भागवत भोसले, रोहन सावंत, अमोल बनसोडे, करण तरुडे, करणसिंह दोडे, रोहित लामतुरे, अरविंद राठोड, सानिया पठाण आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ह.भ.प. डॉ. अनिल मुंढे यांनी केले. सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे यांनी केले. तर आभार श्री. अजय मुरमुरे यांनी मानले.