रोकडा सावरगावमध्ये एक हजार वृक्षारोपण, नैसर्गिक ऑक्सिजनसाठी ग्रामस्थांचा पुढाकार

रोकडा सावरगावमध्ये एक हजार वृक्षारोपण, नैसर्गिक ऑक्सिजनसाठी ग्रामस्थांचा पुढाकार

लातूर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांचे जीव गेले. त्यामुळे आता नैसर्गिक ऑक्सिजन मिळावा म्हणून लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव इथे सह्याद्री देवराई प्रतिष्ठानने ऑक्सिजन देणाऱ्या एक हजार वृक्षांचे रोपण केलंय. झाडांच्या देखरेखीसाठी ग्रामस्थही सरसावले आहेत. रोकडा सावरगाव येथील संत बुवासाहेब महाराज मंदिर ते संत बापदेव महाराज मंदिरापर्यंत हे एक हजार झाडांचे वृक्षारोपण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलंय. सह्याद्री-देवराई प्रतिष्ठानने ऑक्सिजन देणारी वृक्षांची रोपं पुरविली आहेत. ज्यात वड, पिंपळ, कडूलिंब, करंज अशा देशी ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, ‘नाम’चे विलास चामे, निवृत्त पाटबंधारे अभियंता राम घोटे, पत्रकार शशिकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विशेषबाब म्हणजे गावातील प्रत्येक व्यक्तीने झाड दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार करीत पुढच्या वर्षी या झाडांचा वाढदिवस करण्याचा संकल्पही ग्रामस्थांनी केलाय.

यावेळी अहमदपूरचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, निवृत्त पाटबंधारे अभियंता राम घोटे, ‘नाम’चे विलास चामे, पत्रकार शशिकांत घोणसे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संतांची भूमी, स्वातंत्र्यसैनिकांचे गाव असलेल्या रोकडा सावरगावची ओळख ही वृक्षारोपन आणि वृक्ष संवर्धन करणारे गाव म्हणून व्हावी अशी अपेक्षा यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. कार्यक्रमासाठी वनविभागाचे वनपाल तेलंग, वनाधिकारी होनराव, ‘निवृत्त न्यायाधीश विजयकुमार बोडके, सह्याद्री वनराईचे सुशील घोटे, दीपकराव जाधव, डॉ. सुधाकर मुरुडकर, राम बेल्लाळे, शेखर जाधव, ऍड. सुनील केंद्रे, ग्रामविकास अधिकारी करुळेकर, उत्तमराव घोटे, भाऊसाहेब जाधव, प्रविण जाधव, युवराज घोमरे, राहुल बेल्लाळे, मोहन मुरुडकर, श्रीरंग जाधव, शेषराव जाधव, शिवकुमार पाटील, सानप, भारती आदींसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About The Author