सर्व शासकीय विभागांनी त्यांच्या कार्यालयाच्या परिसरात धूम्रपान व तंबाखू खाऊन थुंकण्यास प्रतिबंध घालावा

सर्व शासकीय विभागांनी त्यांच्या कार्यालयाच्या परिसरात धूम्रपान व तंबाखू खाऊन थुंकण्यास प्रतिबंध घालावा

लातूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास प्रतिबंध करण्यात आलेला असून त्यानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, कार्यालय परिसर, शासकीय व खाजगी अस्थापना, सर्व ठिकाणी तसेच शासकीय व खाजगी शैक्षणिक संस्था तंबाखू मुक्त करण्यासाठी केंद्र शासनाच्या सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने जाहिरात प्रतिबंध, व्यापार विनिमय आणि वाणिज्य उत्पादन पुरवठा आणि वितरण(COTPA) अधिनियम 2003 च्या तरतुदीची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी. तसेच जिल्हा तंबाखू नियंत्रण सेलने महानगरपालिका, नगरपालिका व जिल्ह्याच्या अन्य भागात सर्वेक्षण करून धूम्रपान व तंबाखू खाऊन थुंकणाऱ्या व्यक्तीवर मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित तंबाखू नियंत्रण कार्यक्रम आढावा बैठकीत जिल्हाधिकारी पृथ्वीराज बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्‍मन देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, तंबाखू नियंत्रण सेलच्या जिल्हा समन्वयक डॉ. माधुरी उटीकर, स्त्री रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर राहुल वाघमारे, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे श्री शिंदे यांच्यासह यांनी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पृथ्वीवरची पुढे म्हणाले की, जिल्हा तंबाखू नियंत्रण सेल ने धूम्रपान करणारे व तंबाखू खाऊन थुंकणाऱ्या व्यक्तीवर मोठ्या प्रमाणात कारवाई करून त्यांना प्रतिबंध करणे आवश्यक आहे. मागील वर्षीय सेलने खूपच कमी प्रमाणात दंडात्मक कारवाई केलेली दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षी महानगरपालिका, नगरपालिका व जिल्ह्याच्या अन्य भागात वेळोवेळी सर्वेक्षण करून धुम्रपान करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाईची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवावी व व्यसनास प्रतिबंध करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय व निमशासकीय विभागांनी त्यांच्या कार्यालय व कार्यालय परिसरात धूम्रपान व तंबाखू खाऊन थुंकरणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच आपला कार्यालयीन परिसर स्वच्छ ठेवण्याची दक्षता घ्यावी. जिल्हा तंबाखू नियंत्रण सेल ने प्रत्येक विभागास ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची ये-जा असते अशा कार्यालयांना दंड वसूल करण्यासाठी पावती पुस्तिका उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी केली.

जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांनी COTPA अधिनियम 2003 च्या कलम 4 व 6 ब नुसार काटेकोर पालन करून संस्थेच्या 100 यार्ड परिसरातील तंबाखूची विक्री केंद्र प्रतिबंधासाठी योग्य ती कारवाई करावी. तसेच तंबाखू नियंत्रण सेलने व्यसनास प्रतिबंध करण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका व जिल्ह्याच्या अन्य भागात प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवण्यावर अधिक भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी दिले.

प्रारंभी जिल्हा तंबाखू नियंत्रण सेलच्या समन्वयक डॉक्टर माधुरी उटीकर यांनी मागील वर्षभरात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सेलने केलेल्या कामकाजाची माहिती सादर केली. तसेच तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ प्रतिबंधक कायदा 2003 मधील कलम 4 नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास बंदी असून वैयक्तिक गुन्हा केल्यास 200 रुपये दंड जाग्यावर वसुलीची तरतूद असून कलम 5 नुसार तंबाखूजन्य पदार्थाच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष जाहिरातीवर बंदी, कलम 6अ नुसार 18 वर्षाखालील व्यक्तींना तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी व कलम 6 ब नुसार शैक्षणिक संस्थांच्या 100 यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी असून उल्लंघन केल्यास दोनशे रुपये दंड जागेवर वसूल करण्याची तरतूद असल्याची माहिती त्यांनी दिली.

About The Author