नियमबाह्य काम करणाऱ्या ग्रामसेवक चलमले यांच्यावर कारवाई करा
लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील चिंचोली बल्लाळनाथ येथे कार्यरत असणारे ग्रामसेवक चलमले यांनी कुठल्याच कामाची शहानिशा न करता स्वतःच्या स्वार्थापोटी गावातील बरीच कामे शासकीय नियम डावलून करण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे नियमबाह्य काम करणाऱ्या ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राजकुमार सुरवसे यांनी केली आहे.
चिचोंली बल्लाळनाथ गावात करण्यात आलेल्या कामात, ज्या वस्त्यांचा कृती आराखड्यामध्ये दलित वस्ती म्हणून उल्लेख नाही अशा ठिकाणी दलित वस्ती दाखवून दलित वस्ती चे बजेट दलित वस्तीवर खर्च न करता इतरत्र ठिकाणी खर्च केलेले आहे. तसेच मंजूर कृती आराखड्यानुसार केलेली कामे व खर्च करावयाचे बजेट खर्च करण्यात आले नाही. जीएसटी ची बिले न घेता स्वतःच्या स्वार्थापोटी ठेकेदारास लाखो रुपयांची बिले आदा करून शासनाची दिशाभूल फसवणूक केलेली आहे. त्याचबरोबर अपंगांना 13 व 14 व्या वित्त आयोगातून जो निधी मिळायला पाहिजे तेवढा निधी दिला गेला नाही. तो ही काहींना दिला आहे तर काहींना दिला नाही. जीएसटी च्या पावत्या घेऊन काही अपंगांना त्यांच्या हक्काचा निधी दिलेला नाही. ग्रामपंचायत मधील व्हायचर वरील रक्कम जी अदा करण्यात आलेली आहे, त्यामध्ये खाडाखोड करून खोटे व्हाऊचर जोडलेले आहेत. गावातील नाथमंदिर ते ग्रामपंचायत कार्यालय रिंग रोड झालेली काम व उचललेले बजेट यामध्ये फार मोठी तफावत असल्याचे दिसून येत आहे ही सर्व कामे ग्रामसेवक यांच्या कार्यकाळात झालेली असून चौकशी झाल्याशिवाय त्यांची बदली करण्यात येऊ नये तसेच त्यांच्याकडे देण्यात आलेला अतिरिक्त कार्यभार रद्द करून व शासकीय नियम बाजूला ठेवून मनमानी कारभार करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी लातूर ग्रामीण शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख राजकुमार सुरवसे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांच्याकडे केली आहे.