विशेष पथकाच्या धाडीत तीन लाखाचा मुद्देमाल जप्त
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर ग्रामीण हद्दीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून गुटका, मटका, जुगार, अवैध दारू विक्री असे प्रकार बोकाळले होते. या भागातील अवैध धंद्यावर अंकुश ठेवावा. अशा पद्धतीची मागणी जनतेमधून सतत होत होती. अवैध दारू विक्रीच्या विरोधात तर महिलांनी मोर्चा काढला होता. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी स्थापन केलेल्या विशेष पथकाने उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत छापेमारी करून दोन लाख 90 हजार 510 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची कारवाई केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने उदगीर शहरातील नांदेड रोड वरील पांडू धाबा समोर छापा मारून अवैध देशी दारूची वाहतूक करणारे मारुती अल्टो कार क्रमांक एम एच 24 व्ही 76 69 जप्त केली आहे. या कारमध्ये 17हजार दोनशे रुपयांची देशी दारू भिंगरी संत्रा कंपनीच्या 288 बॉटल्स मिळून आल्या. या पथकाने दोन लाख 50 हजार रुपये किमतीची कार आणि सतरा हजार दोनशे रुपयांची देशी दारू असा एकूण दोन लाख 67 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील पोलीस कर्मचारी चंद्रकांत डांगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सचिन राजकुमार मसूरे यांच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुरनं. 275 /21 कलम 65 (अ) (ई )महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याच विशेष पथकाने उमा चौक परिसरात सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर आरोपी शेख अलिमुद्दिन जिलानी आणि गणेश पंढरीनाथ उदबाळे हे लोकांकडून पैसे घेऊन कल्याण, मिलन, डे टाईम बाजार नावाचे जुगाराचे आकडे लावून खेळत व खेळवीत असल्याचे या पथकाच्या निदर्शनास आल्यानंतर धाड टाकून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम असा एकूण 23 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पथकातील पोलिस कर्मचारी मोहन सुरवसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुरनं. 274/ 21 कलम 12 (अ )महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईसाठी विशेष पथकातील चंद्रकांत डांगे, मोहन सुरवसे, चौधरी, खंडागळे, शेंडगे यांनी सहभाग घेतला.