शालांत प्रमाणपत्र परीक्षेत लातूरच्या केशवराज विद्यालयाचे उत्तुंग यश
लातूर (प्रतिनिधी) : दि. १७ जुलै रोजी घोषित झालेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेच्या निकालात लातूर येथील श्री केशवराज विद्यालयाने दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी उत्तुंग यश प्राप्त केले. जिल्ह्यात गुणवत्तेचा उच्चांक प्रस्थापित करण्याची परंपरा याही वर्षी केशवराज विद्यालयाने कायम राखली आहे. २०२१ च्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेला केशवराज विद्यालयातून ६६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यांपैकी २४ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण प्राप्त केले. १७१ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा अधिक गुण घेतले. विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांची संख्या ४२१, प्रथम श्रेणी प्राप्त विद्यार्थी १८४, द्वितीय श्रेणी प्राप्त ६२ विद्यार्थी, तृतीय श्रेणी प्राप्त करणारे ०२ विद्यार्थी आहेत. शाळेचा एकूण निकाल १०० टक्के लागला आहे. गुणवत्तेचा आलेख कायम राखतानाच विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविण्यासाठी शाळेच्या वतीने वर्षभर ऑनलाईन व ऑफलाईन तासिका, संस्थेतील विविध विषयातील तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, प्रश्नसंचांचा सराव, वासंतिक वर्ग आदी उपक्रम वर्षभर राबवण्यात आले.
श्री केशवराज विद्यालयाने इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केल्याबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्रजी आलुरकर, कार्यवाह नितीनराव शेटे, सहकार्यवाह प्रा. चंद्रकांत मुळे, सहकार्यवाह हेमंत वैद्य,सहकार्यवाह सौ. कल्पनाताई चौसाळकर, विद्यासभा अध्यक्ष किरणराव भावठाणकर, संयोजक प्रकाश जोशी, श्री केशवराज शैक्षणिक संकुलाचे स्थानिक समन्वय समिती अध्यक्ष यशवंतराव देशपांडे (तावशीकर), कार्यवाह जितेश चापसी, शालेय समिती अध्यक्ष आनंदराज देशपांडे यांनी श्री केशवराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय विभुते, उपमुख्याध्यापक महेश कस्तुरे,पर्यवेक्षक संजय कुलकर्णी, संदीप देशमुख, दिलीप चव्हाण तसेच यशवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, सर्व शिक्षक, दहावी विभाग प्रमुख सौ.रेणुका गिरी,सहप्रमुख रमेश चव्हाण यांचे अभिनंदन केले आहे.