कृषी महाविद्यालयात मरणोत्तर नेत्रदान जनजागृती शिबिर
उदगीर (एल.पी.उगीले) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संलग्नित कृषी महाविद्यालय, डोंगरशेळकी तांडा, उदगीर येथे राष्ट्रीय सेवा योजना तर्फे स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त ” मरणोत्तर नेत्रदान जनजागृती शिबिराचे “, दि.२५ फेब्रुवारी , २०२५ रोजी यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.पी.सूर्यवंशी, प्रमुख मार्गदर्शक डॉ. विष्णू पवार , उपप्राचार्य डॉ.ए एम पाटील,रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ.एस.बी.पवार , महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि रासयो स्वयंसेवक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर वि दा सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपप्राचार्य डॉ. ए एम पाटील यांनी प्रास्ताविकता व मार्गदर्शकांचा परिचय करून दिला. मार्गदर्शक नेत्रतज्ञ डॉ. विष्णू पवार यांनी ‘नेत्रदान करा आणि मृत्यूनंतरही आपले डोळे जिवंत ठेवून हे जग पहा, या याविषयी उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. नेत्रदाना बाबतीत , समाजातील अंधश्रद्धा व नकारात्मक विचारसरणी या बाबत खुलासा केला . ‘नेत्रदान हे जीवनदान आहे , मरणोत्तर नेत्रदान करून आपण नेत्रहीनांना, जन्मजात अंधांना नव्याने दृष्टी देऊन , सृष्टी पाहू शकतो.वयाच्या १८ वर्षा पासून ते ९० वर्षापर्यंत आपण नेत्रदान करू शकतो. याविषयी उपस्थितांना ज्ञात केले . अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. ए पी सूर्यवंशी यांनी “जिवंतपणी रक्तदान जाता जाता अवयवदान आणि मृत्यूनंतर नेत्रदान” या अनुषंगाने उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,आणि ऋणनिर्देश राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. एस. बी. पवार यांनी केले.
