मनाच्या अंतरंगी डोकावले तर समाधान मिळते – प्रा. डॉ. सचिन घुगे.
उदगीर (एल.पी.उगीले)
मानवी जीवन हे सुखदुःखांच्या अनेक चढउतारांनी भरलेले आहे. बऱ्याचदा चुकीच्या समजामुळे दुःख वाढत असते. यासाठी मी आणि माझे मानसिक स्वास्थ्य याचा विचार करून शरीराबरोबरच मनाची ही काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणून मनाच्या अंतरंगी डोकावले तर खरे समाधान मिळू शकते, असे मत प्रा. डॉ. सचिन शेषराव घुगे यांनी व्यक्त केले.
चला कवितेच्या बनात या साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक चळवळ अंतर्गत गेल्या चौदा वर्षापासून चालू असलेल्या डॉ. विष्णू पवार यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या 331 व्या वाचक संवाद मध्ये डॉ. किरण सावे लिखित अंतरंगी डोकावताना या साहित्यकृतीवर संवाद साधताना प्रा. डॉ. सचिन शेषराव घुगे म्हणाले की, प्रत्येक घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा मानला असून अतार्किक स्वगतामुळे मनुष दुःखी होत असल्याचे सांगितले. आनंद निर्माण करणाऱ्या ध्येयवादी दृष्टीकोना मुळे जगण्याला बळ मिळते व आनंद लाभतो. प्रत्येकाजवळ साक्षीभाव असावा, त्यामुळे सकारात्मकता वाढते. व संयम देखील वाढतो. दुसऱ्यांचे दुःख ऐकून घेतल्याने मन बंधमुक्त होते व जीवन आनंदित व उत्साही बनते.
यानंतर झालेल्या चर्चेत अनेकांनी सहभाग नोंदवला. अध्यक्षीय समारोप करताना डॉ. विष्णू पवार म्हणाले की, प्रत्येक ठिकाणी आनंद आहे पण तो घेता आला पाहिजे. ठरवून केलेल्या कार्याची आपण मोठी किंमत मोजतो, पण मोफतच्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो म्हणून आपल्याला दुःख जास्त होते.
या कार्यक्रमाचे सूत्र संचलन संयोजक अनंत कदम यांनी केले, पाहुण्यांचा परिचय प्रा.बालाजी सूर्यवंशी यांनी करून दिला तर आनंद बिरादार यांनी आभार मानले.
