छत्रपती शिवराय हे शेतकरी व सर्वसामान्यांचे स्वराज्य निर्माते – प्रा. अजितकुमार जाधव

0
छत्रपती शिवराय हे शेतकरी व सर्वसामान्यांचे स्वराज्य निर्माते - प्रा. अजितकुमार जाधव

उदगीर : (एल.पी.उगीले) आदिलशाही, निजामशाही, मोगलशाही या सर्व शासनकर्त्यांच्या काळात शेतकऱ्यांवर अनन्वित अत्याचार झाले. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्यामुळे त्याच्यावरती अन्याय होता कामा नये, अशी छत्रपती शिवरायांची भूमिका होती. शेतकऱ्यावर अस्मानी आणि सुलतानी संकट कायमस्वरूपी राहिले आहे. त्यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठीच छत्रपती शिवरायांनी शेतकरी व सर्व सामान्यांचे स्वराज्य निर्माण केले होते, असे मत शिवश्री प्रा. अजितकुमार जाधव यांनी व्यक्त केले. ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बहि:शाल व्याख्यानमालेतील गुडसूर येथे पहिले पुष्प गुंफतांना ‘शेतकऱ्यांचा राजा : छत्रपती शिवराय’ या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे जेष्ठ सदस्य तथा माजी आ. प्रा. मनोहरराव पटवारी हे होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, गुडसूरचे सरपंच उत्तम सूर्यवंशी, भारत पारसेवार, नागेश नवाडे, डॉ. दत्ताहरी होनराव यांची विशेष उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्रा. जाधव म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या कार्यामागे संतांच्या विचारांची प्रेरणा होती. ‘जे का रंजले गांजलेl त्यासी म्हणे जो आपुलेll तोचि साधू ओळखावाl देव तेथेची जाणावाll’ अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी रचले होते, त्याचा परिणाम छत्रपती शिवरायांवरती झाला. छत्रपती शिवरायांनी जात आणि धर्माचा विचार न करता गुणवत्तेवर आधारित स्वराज्य निर्माण केले. इतिहासाची स्व-लाभाकरिता मोडतोड न करता महापुरुषांचा खरा इतिहास तरुणांनी समजून घेतला पाहिजे, असे आवाहन उपस्थितांना केले. अध्यक्षीय समारोप करताना प्रा. मनोहरराव पटवारी म्हणाले, महापुरुषांनी समाजाला दिशा दाखविण्याचे काम केले आहे. त्या वाटेवर आपण सर्वांनी चालणे महत्त्वाचे आहे. छत्रपती शिवरायांनी राजेशाहीमध्ये देखील लोकशाहीची मूहूर्तमेढ रोवली होती. ‘गनिमीकावा’ हा छत्रपती शिवरायांनी विश्वाला दिलेला विजयी मूलमंत्र आहे. तो सर्वांनी समजून घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के म्हणाले, बहि:शाल व्याख्यानमालेच्या माध्यमातून समाज प्रबोधन व समाजमनाला वळण लावण्याचे कार्य जाणीवेने केले जात असते. विचारांचा जागर खेडोपाडी घालण्याचे कार्य अशा व्याख्यानातून होत असतो. यापुढे देखील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या माध्यमातून ही परंपरा अशीच चालू राहील, असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय बहि:शाल केंद्राचे समन्वयक डॉ. गौरव जेवळीकर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रा. प्रवीण जाहुरे यांनी मानले. यावेळी गुडसूर गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!