मराठी भाषा संस्कारक्षम – शिवाजी स्वामी
उदगीर (एल.पी.उगीले)
हजारो वर्षापासून मराठी साहित्याची समृद्ध परंपरा आहे. मराठी माणूस संवेदनशील असून तो इतरांसोबत अतिशय प्रेमाने वागत असतो. हे सगळे संस्कार त्याच्यावर नकळतपणे साहित्यामुळे झाले आहेत. एका अर्थाने मराठी भाषा ही सुसंस्कृत आहे, असे विचार कवी शिवाजी स्वामी यांनी व्यक्त केले.
श्री हावगीस्वामी महाविद्यालयात मराठी विभागाच्यावतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन.जी.एमेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी शिवाजी स्वामी उपस्थित होते. सुरुवातीला कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
माणसाच्या जडणघडणीत भाषेचे फार मोठे योगदान आहे. मातृभाषा ही सक्तीचे करणे काळाची गरज असून ही भाषा खऱ्या अर्थाने पूर्वजापासून लोकसाहित्याच्या माध्यमातून टिकून आहे. असे प्रास्ताविकात मराठी विभागाचे प्रमुख डॉ.सुशीलप्रकाश चिमोरे यांनी सांगितले.
पुढे बोलताना शिवाजी स्वामी म्हणाले, मातृभाषा ही हृदयाची भाषा असते. त्याचे जतन, संवर्धन करणे काळाची गरज आहे. असे सांगत त्यांनी अनेक कविता सादर केल्या.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. एन.जी.एमेकर म्हणाले, महाराष्ट्रात मराठी भाषा ही आता हळूहळू कार्यालयीन भाषा होत आहे. मातृभाषा ही आपल्या स्वाभिमानाचे प्रतीक असते. या भाषेच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल प्रा.अजित रंगदळ, प्रा.राजा कांबळे,राम राठोड आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमास डॉ.दत्ताहरी होनराव, प्रा.सुदर्शन मसुरे, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.म.ई. तंगावार तर आभार विद्यार्थी अक्षय दुवे यांनी मानले.
