अजित शिंदे यांच्यावर राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी !राष्ट्रसेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड, उदगीरकरांसाठी गौरवाची बाब !!!

0
अजित शिंदे यांच्यावर राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारी !राष्ट्रसेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड, उदगीरकरांसाठी गौरवाची बाब !!!

उदगीर (एल.पी.उगीले) अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठणारा युवा नेता म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असलेला छात्र भारती संघटनेचा राज्याचा माजी अध्यक्ष अजित शेषराव शिंदे यांच्या एकूण कामकाजाची आणि धडक कामाची दखल घेऊन राष्ट्रसेवा दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे.
उदगीर ही कर्मभूमी असलेल्या अजित शिंदे यांनी आपल्या वैचारिक अधिष्ठानाच्या पाठबळावर केलेले एकूण काम हे प्रत्येकांना मोहून टाकणारे आहे. असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण राष्ट्रसेवा दल ही फार मोठी आणि वैचारिक अधिष्ठान असलेली संघटना आहे. समाजवादी विचारधारेचा पाया मजबूत असलेली ही संघटना देश पातळीवर समता, बंधुता आणि स्वातंत्र्य या त्रिसूत्रीला धरून काम करते. मुळात राष्ट्रसेवादल समाजवादी विचारधारेच्या तत्कालीन नेते मंडळींनी राष्ट्रसेवा दलाची स्थापना केली होती. ज्यामध्ये प्रामुख्याने एस एम जोशी, नानासाहेब गोरे ,शिरुभाऊ लिमये यांची महत्त्वाची भूमिका होती. स्वातंत्र्य चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, इंग्रजांनी भारताला एकतर्फी महायुद्धामध्ये लोटले गेल्यामुळे चिडलेल्या स्वातंत्र्य चळवळीतील विचारधारेच्या नेत्यांनी स्वातंत्र्य चळवळीत लढणारे तरुण आपल्याला जमा केले पाहिजेत, या भावनेतून 4 जून 1941 रोजी राष्ट्रसेवा दलाची स्थापना केली होती. स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतर समाजवादी समाज रचना निर्माण करण्यासाठी झुंजणारे समाजवादी विचारधारेचे सैनिक तयार करणे, हा राष्ट्रसेवा दलाच्या स्थापने मागचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले जाते.
सकारात्मक विचारधारा घेऊन चालणारा तरुण, संघटनात्मक बनावा अशा तरुणांना एकत्र करावे आणि त्यांना स्वातंत्र्याची प्रेरणा द्यावी, हा त्यांच्यामधील फार महत्वाचा हेतू होता. आणि या हेतूनही संघटना निर्माण झाली. या संघटनेला फार मोठा इतिहास आहे. वैचारिक अधिष्ठान असलेले बॅरिस्टर नाथ पै, मधु लिमये, मधू दंडवते, मृणालताई गोरे, माधवराव गायकवाड, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. बापूसाहेब काळदाते ही सगळी मंडळी या संघटनेमध्ये सक्रिय होती. त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व पुढे समर्थपणाने केले. त्या अर्थाने ही ऐतिहासिक घटना आहे.
त्यानंतर 1942 चा लढा आला आणि “चले जाव”च्या लढ्यामध्ये सेवा दलाच्या सैनिक लहान असो की मोठा असो एक तर तो तुरुंगात गेला किंवा भूमिगत होऊन स्वातंत्र्यलढ्यासाठी सहकार्य केले. काँग्रेसच्या मंडळींना आपल्या अधिवेशनामध्ये स्वयंसेवक पाहिजे होते आणि राष्ट्रसेवा दलाने ते काम करावे, अशी त्यांची अपेक्षा होती. राष्ट्रसेवा दलाची भूमिका अशी होती की, आम्ही समाजवादी आहोत पण समाजवादी पक्षाचे नाही तर आम्ही समांतर काम करणारे आहोत, आम्ही कुठल्या पक्षाचे स्वयंसेवक नाही. आम्ही स्वतंत्रपणे आमचे संघटन करणार आहोत .निवडणुकांमध्ये समाजवादी विचाराच्या माणसाला आम्ही पाठिंबा देऊ पण आमचे पूर्णवेळ सेवक हे निवडणुकांमध्ये उभे राहणार नाहीत. ते स्वतंत्रपणे काम करतील, अशी भूमिका सेवा दलाने घेतली होती. आणि ती काँग्रेसला परवडणारी नव्हती, म्हणून त्यांनी काँग्रेस सेवा दल वेगळे केले .आणि राष्ट्रसेवा दलाला काँग्रेस मधून बाहेर पडावे लागले.
त्यानंतर राष्ट्र सेवा दलाच्या नेत्यांच्या प्रेरणेतून विशेषता एस एम जोशींची प्रेरणा त्याला फार मोठी कारणीभूत ठरली, जे कार्यकर्ते निर्माण झाले, जे नेते निर्माण झाले, ते पुढे विखुरले गेले. त्या त्या पक्षात त्यांनी नेतृत्व केले. अगदी शिवसेनेमध्ये दत्ता नलवाडे जे विधानसभेचे सभापती झाले ते सेवादलातूनच आलेले होते, प्रमोद नवलकर हे ही सेवा दलातूनच आलेले होते. काँग्रेसमध्ये आणि कम्युनिस्ट पार्टीमध्येही गेलेले अनेक नेते हे सेवा दलातूनच आलेले होते. हैदराबादचा लढा असो की गोव्याचा लढा असो त्यात एस एम जोशींच्या भूमिकेतून आणि मार्गदर्शनाखाली तसेच नानासाहेब गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. लोहिया यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुणांनी मोठे योगदान दिले.
अशा पद्धतीच्या एका वैचारिक व्यासपीठ आणि अधिष्ठान अशी भूमिका घेऊन काम करणाऱ्या संघटनेचे देश पातळीवरचे नेतृत्व करण्याची संधी उदगीरच्या तरुणाना मिळावी, ही निश्चितच गौरवास्पद बाब आहे.
अजित शिंदे यांची निवड एक मार्च रोजी पुणे येथे राष्ट्रसेवा दलाच्या साने गुरुजी मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष, सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रसेवा दलाचे मुख्य निवडणूक अधिकारी ॲड. जाफर आत्तार यांनी या निवडणुकीची घोषणा केली. छात्रभरती विद्यार्थी संघटनेचे राज्याचे माजी अध्यक्ष राहिलेले अजित शिंदे हे संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या कामातून ओळखीचे आहेत. त्यांनी डॉ. ना य डोळे फाउंडेशनच्या माध्यमातून देखील डॉ. ना य डोळे यांचे विचार महाराष्ट्राला सांगण्याचे मोठे काम केले आहे. लातूर जिल्ह्यातील एनआरसी विरोधातील अजित शिंदे यांचे आंदोलन असेल किंवा प्रयास आंदोलन असेल यासोबतच संघटनात्मक दृष्टीने समाजवादी विचारधारेच्या संदर्भातील विविध आंदोलनामध्ये सक्रिय योगदान देणारा युवा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्राला अजित शिंदे यांची चांगली ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या नावाची घोषणा होताच सर्वांनी अजित शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. आणि एका युवा आणि ध्येयनिष्ठ कार्यकर्त्याला या पदावर बसवण्याचे समाधान निवडीच्या नंतर अनेक जाणकारांनी व्यक्त केले.निवड झाल्यानंतर अजित शिंदे यांचे स्वागत आणि सत्कारही करण्यात आला. यामध्ये राष्ट्रसेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. झाकीर काजी, माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य तसेच माजी कार्यकारी विश्वस्त कपिल पाटील इत्यादी मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!