पिंपरी घाटात नादुरुस्त कंटेनरला कारची धडक; चालक गंभीर जखमी
उदगीर (एल.पी.उगीले): उदगीर शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंपरी घाटात अत्यंत धोक्याच्या वळणावर उभ्या असलेल्या नादुरुस्त कंटेनरला कारची धडक बसून गंभीर अपघात झाला, नादुरुस्त कंटेनरला कोणताही इशारा देणारा कपडा किंवा फलक लावले गेले नव्हते. या अपघातात संगमेश्वर बिरादार वलांडीकर महाराज यांची कार दुर्घटनाग्रस्त झाली आहे, कारचालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने उदगीर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, महाराज उदगीर येथून कारने (क्रमांक एम एच 14 CS 5897 ) जळकोटमार्गे कीर्तनासाठी जात असताना, पिंपरी घाटात नादुरुस्त अवस्थेत उभ्या असलेल्या कंटेनरला (TS 08 1497 ) सदरील कार जोरदार धडकली. या अपघातामुळे कारचे मोठे नुकसान झाले. स्थानिकांनी तातडीने मदत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले.
अपघाताची माहिती मिळताच उदगीर ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे कंटेनर रस्त्यावर नादुरुस्त अवस्थेत थांबलेल्या अवस्थेत असूनही, त्यास कोणत्याही स्वरूपाची सूचना, फलक किंवा इशारा नव्हता. त्यामुळे वाहनचालकाला तो दिसला नाही आणि हा अपघात घडला.
सध्या पोलीस पथक कंटेनर मालक व संबंधित कंटेनरच्या चालकाचा शोध घेत आहेत. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती, मात्र पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान ओळखून वाहतूक सुरळीत केली. पुढील तपास उदगीर ग्रामीण पोलीस करत आहेत.
