ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणाचा संदेश
उदगीर (एल.पी.उगीले) महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या ग्रंथालयातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त विशेष ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या ग्रंथप्रदर्शनात महिलांच्या सशक्तीकरण, हक्क, इतिहास, साहित्य, सामाजिक योगदान आणि विविध क्षेत्रांतील त्यांच्या भूमिकांवर प्रकाश टाकणारे पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले. या प्रदर्शनास प्रमुख पाहुण्या पीएसआय सोनाली गोडबोले- पाटील, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष डॉ.रेखा रेड्डी, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव अॅड. एस. टी. पाटील चिघळीकर, सदस्य प्रशांत पेन्सलवार, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के, डॉ. स्मिता लखोटीया यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने भेट दिली.
महिला सक्षमीकरण, त्यांचा सामाजिक आणि शैक्षणिक विकास याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. विविध लेखकांनी महिलांच्या संघर्ष, योगदान आणि यशोगाथा उलगडणारी पुस्तके यात समाविष्ट केली होती. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी आणि वाचनसंस्कृतीला चालना मिळावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.
