समाजभान असलेली स्त्री निर्माण होणे आवश्यक : प्रा. डॉ. क्रांती मोरे
उदगीर (एल.पी.उगीले) महिला अनेक क्षेत्रात आघाडीवर आहेत. महिला सक्षमीकरणाच्या गप्पा मोठया प्रमाणात मारल्या जातात. परंतु केवळ आर्थिकदृष्टया सक्षम झाले म्हणजे महिला सक्षम झाली, असे नाही, तर समाजभान असलेली स्त्री निर्माण झाल्यास खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण झाले आहे. असे म्हणता येईल, असे प्रतिपादन लातूर येथील प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. क्रांती मोरे यांनी केले.
येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रलच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रा. डॉ. मोरे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबच्या अध्यक्षा सरस्वती चौधरी होत्या. व्यासपीठावर प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या उदगीरच्या संचालिका ब्र. कु. महानंदा बहेनजी, रोटरी क्लबच्या सचिव ज्योती चौधरी, प्रोजेक्ट चेअरमन महानंदा सोनटक्के उपस्थित होते.
प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक महानंदा सोनटक्के यांनी केले. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
पुढे बोलताना डॉ. क्रांती मोरे म्हणाल्या की, महिला आज विविध क्षेत्रात पुढे जात आर्थिक उन्नती करून घेत आहेत, ही समाधानाची बाब आहेत. मात्र आज समाजात होत असलेल्या महिलांवरील अत्याचारावर बोलायला कोणी महिला पुढे येत नाही ही खेदाची बाब आहे असे सांगून लग्नाच्या बाबतीत बिभीत्सपणा वाढला आहे. प्री- वेडींगमुळे लग्न मोडल्याच्या घटना वाढत आहेत, अशा घटना टाळण्यासाठी त्यांनी भावी पिढीवर योग्य संस्कार करण्यासाठी महिलांचे योगदान महत्वाचे असल्याचे यावेळी डॉ. मोरे म्हणाल्या.
यावेळी बोलताना ब्र. कु. महानंदा बहेनजी म्हणाल्या की, रोटरीने महिलांचा नेहमीच सन्मान केला आहे, असे सांगून तन व धनाने आज महिला सक्षम झाल्या आहेत. पण मनाने त्या अजूनही कमजोर आहेत, त्यासाठी मनाचे सक्षमीकरण होणे गरजेचे आहे. असे त्या म्हणाल्या. सुशिक्षित समाज निर्माण झाला आहे, पण सुसंस्कृत झाला नाही. अशी खंत व्यक्त करून महिला व मुलींनी शरीर प्रदर्शन करू नये असा सल्ला देत पाल्यांना मर्यादामध्ये राहायला शिकविले तर समाजात अनुचित प्रकार घडणार नाहीत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्राजक्ता भांगे, वैष्णवी पाटील, श्रेया शिरसीकर, नंदा स्वामी, रुक्मिणी हालसे या महिलांचा नारी शक्ती पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी रोटरी क्लबच्या वतीने घेण्यात आलेल्या पाककला व फन गेम्स स्पर्धेतील विजेता महिलांना बक्षीसे देण्यात आले. अंजली मुक्कावार यांनी स्वागतगीत गायिले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. अनिता हैबतपुरे, डॉ. सुलोचना येरोळकर यांनी केले. आभारप्रदर्शन ज्योती चौधरी
यांनी केले. कार्यक्रमासाठी सुनीता मदनूरे, विद्या पांढरे, डॉ. सुनीता चवळे, दर्शना मांगुळकर, वैभवी कणसे आदींसह रोटरी पदाधिकारी व सदस्यांनी पुढाकार घेतला.
