रमजान निमित्त उदगीरमध्ये सामुदायिक इफ्तार कार्यक्रम संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) रमजानच्या पवित्र महिन्याच्या निमित्ताने जमाअ़ते इस्लामी हिंद, उदगीरच्या वतीने अल-अमीन हायस्कूल येथे इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जमाते इस्लामी हिंद उदगीरचे शहराध्यक्ष दायमी अब्दुल रहीम होते. विशेष अतिथी म्हणून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात हाफ़ीज़ क़ुरआन हाशमी अबू तल्हा यांनी केलेल्या भावपूर्ण कुराण पठणाने झाली. त्यानंतर डॉ. असगर यांनी प्रास्ताविक करताना रमजानच्या महत्त्वावर प्रकाश टाकत म्हटले, “रमजान हा केवळ उपवासाचा नव्हे, तर समाजातील विविध घटकांमध्ये प्रेम, सहकार्य आणि बंधुभाव वाढवणारा पवित्र महिना आहे. अशा कार्यक्रमांमुळे समाजात धार्मिक समजूतदारपणा आणि एकता दृढ होते. असे सांगितले”
यानंतर देवणीकर मुजीब यांनी रमजानमधील रोज्याच्या अध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्वावर मार्गदर्शन करत सांगितले की, “रोजा म्हणजे केवळ अन्नत्याग नव्हे, तर मन आणि आत्म्याचे शुद्धीकरण आहे. हा संयम, सहानुभूती आणि परोपकाराचा मार्ग दाखवतो. कुरआनने दिलेल्या प्रेम, दया आणि न्यायाच्या शिकवणींनुसार आपण समतोल आणि सुसंवादी समाज घडवू शकतो. त्यांनी रमजानचे महात्म्य हे पवित्र कुरआन अवतरणा मुळे असल्याचे सांगितले. कुरआन सर्वांसाठी अंतिम व सुरक्षित ईश्वरी ग्रंथ आहे, व सर्वांनी याचा अभ्यास करावा. असे आवाहनही केले.”
कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी आपला अनुभव सांगताना म्हटले, “मी मागील पाच दिवसांपासून उपवास करत आहे. हा अनुभव आत्मचिंतन करणारा ठरला आहे. विविध धर्मीय नागरिकांनी परस्परांमध्ये प्रेम आणि सौहार्द जपावे, ही रमजानची शिकवण आपणा सर्वांनी आचरणात आणावी.”
या उपक्रमाद्वारे धार्मिक आणि सामाजिक मूल्यांचे सुंदर समन्वय साधण्यात आला. कार्यक्रमाच्या अखेरीस सहभागी मान्यवरांना पवित्र कुरआन तसेच इतर प्रेरणादायी पुस्तके भेट देण्यात आली. उपस्थितांनी सामूहिक इफ़्तारचा आनंद घेत एकमेकांप्रती प्रेम आणि सलोख्याचा संदेश दिला.कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल आयोजकांनी उपस्थितांचे आभार मानले. अशा कार्यक्रमांद्वारे समाजात बंधुभाव आणि शांततेचा संदेश रुजवण्यास मदत होते, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.
