फसवा आणि दिशाभूल करणारा अर्थ संकल्प – आ.अमित देशमुख
लातूर (एल.पी.उगीले)
आश्वासनांची पुनरावृत्ती करणारा, लाडक्या बहिणी, कष्टकरी, शेतकरी, सुशिक्षित बेकार यांच्यासह राज्यातील जनतेची फसवणूक करणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल महाविकास आघाडीच्या वतीने विधानभवनाच्या समोर पायऱ्यावर बसून शासनाचा निषेध व्यक्त करीत आंदोलन करण्यात आले.
राज्याच्या विकासाला आणि धोरणाला दिशा देणारा अर्थसंकल्प सादर केला जावा असा संकेत वर्षानुवर्ष महाराष्ट्रा च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाळला गेला आहे, मात्र अलीकडच्या काळात निवडणूका डोळयासमोर ठेऊन अर्थसंकल्पात योजना राबविल्या जातात, राजकीय पक्षाच्या जाहीरनामा प्रमाणे घोषणा केल्या जातात, निवडणूकीनंतर सत्ता मिळाल्यानंतरही पून्हा नाव बदलून आणि संदर्भ बदलून त्याच आश्वासनांची पुनरावृत्ती केली जात आहे. महाराष्ट्र विधानसभेत आज जाहीर झालेला अर्थसंकल्प त्याच पुनरावृत्ती प्रकारातील आहे. असे विचार काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद तथा लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे आ. अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
अर्थसंकल्पाला सजवण्यासाठी रंजक कवीतांची पेरणी या अर्थसंकल्पात असली तरी राज्यात सध्या निर्माण झालेल्या आर्थिक अराजकतेवर उपाययोजना मात्र त्यात दिसून येत नाहीत. सरकारला कोटयवधी लाडक्या बहीणी मिळाल्याचे राज्याचे उपमुख्यामंत्री ना. अजितदादा पवार यांनी म्हटले असले तरी निवडणूकी पुर्वी पात्र ठरलेल्या लाडक्या बहीणीं निवडणुकीनंतर अपात्र का ठरताहेत? यांचे उत्तर त्यांना देता आलेले नाही. लाडक्या बहिणीचे मानधन १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन ही या अर्थसंकल्पात पाळण्यात आलेले नाही.
महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय उद्योगकेंद्र बनवण्याची घोषणा पून्हा एकदा आजच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे, मात्र महाराष्ट्रातून गुजरात आणि इतर राज्यात उद्योग स्थलांतरीत होत असतांना शासन नेमके काय करीत आहे? हे त्यांनी सांगितले नाही. अशी ही घनाघाती टीका आ अमित देशमुख यांनी याप्रसंगी केली आहे.
महाराष्ट्रात होणाऱ्या जवळपास १६ लाख कोटी रुपये परकीय गुंतवणूकीचे दावोस मध्ये करार झाल्याचे या अर्थसंकल्पात सांगीतले गेले आहे. मागच्या वर्षी दाओस मध्येच झालेल्या ५ लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या करारापैकी किंती गुतवणूक आली? याची नोंद या अर्थसंकल्पात दिसून येत नाही.
शेतीमालाला शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचे आश्वासनही पून्हा एकदा या अर्थसंकल्पात देण्यात आले आहे. बाजारातील सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा एक हजाराने कमी आहेत. या विक्रीतून शेतकऱ्याचा उत्पादन खर्चही निघत नाही. हीच अवस्था कापूस, तुर, धान आणि भाजीपाला उत्पादकांची आहे. सरकार या शेतकऱ्यांना आधार देण्या ऐवजी कवीता करुन त्यांचे मंनोरंजन करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशी घनाघाती टीका करत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनासमोर पायऱ्यावर बसून या फसव्या अर्थसंकल्पाचा जाहीर निषेध केला असल्याची ह माहिती आ. अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.
