डॉ. माधव चंबुले बदनामीच्या चक्रव्युहातील अभिमन्यू – बालाजी फुले
उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर येथील प्रख्यात सर्जन माधव चंबुले हे शून्यातून विश्व उभा करत एका मोठ्या यशोशिखरावर पोहोचतं असताना त्यांच्या या कर्तबगारीला आळा घालू न शकणाऱ्या काही विघ्नसंतोषी व्यक्तींनी त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले आहे. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ते गुन्हे तात्काळ परत घ्यावेत. अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बालाजीराव फुले यांनी केली आहे.
यासंदर्भातले अधिकृत निवेदन उदगीरच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संघटनेच्यावतीने देण्यात आलेले आहे. याप्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बालाजीराव फुले, धनाजी भाऊ मुळे, बाबुराव आंबेगाव, तानाजी फुले, विशाल सोनकांबळे, युवराज कांडगिरी यांच्यासह समता परिषदेचे कार्यकर्ते, पदाधिकारी, ओबीसी ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सामाजिक आंतर आणि कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने सांगितल्या गेलेल्या सूचनांचे पालन करत उपस्थित होते.
या संदर्भात बोलताना बालाजीराव फुले यांनी स्पष्ट केले की, इतर कोणत्याही व्यवसायापेक्षा डॉक्टर हा पेशा विश्वासावर चालणारा आहे. त्याच विश्वासाच्या बळावर महाराष्ट्र, आंध्र प्रदेशच्या सीमेवर डोणगाव या छोट्याशा गावात जन्माला आलेल्या माधवराव चंबुले यांनी आज घडीला महाराष्ट्रातच नव्हे तर सीमावर्ती भागात देखील नावलौकिक मिळवले आहे. त्यांचा हा नावलौकिक अनेकांना खटकू लागल्याने, त्यांच्या विरोधामध्ये षडयंत्र रचले गेले असावे. त्यातूनच त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असावेत. अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
उदगीर सारख्या छोट्या शहरात उदयगिरि क्रिटिकल केअर सेंटर ची स्थापना करून संशोधनाचे केंद्रबिंदू बनवणाऱ्या या कर्तबगार डॉक्टरला समाजामध्ये मोठे मानाचे पद दिले जाते आहे. सर्वसामान्य लोकांसाठी हा धडपडतो आहे. हे न पाहवल्यामुळे अशा पद्धतीचे कृत्य केले गेले असावे. असेही फुले यांनी सांगितले. उदयगिरि क्रिटिकल केअर सेंटर च्या माध्यमातून र्हदय रोग, सर्पदंश, विजेचे शॉक, गंभीर स्वरूपाचा दमा व श्वसनाचे आजार, गंभीर स्वरूपाचा कावीळ, गंभीर किडनीचे आजार, मेंदूचे आजार, अतिगंभीर व मोठ्या ऑपरेशनची सुविधा, ऑपरेशन थिएटर दुर्बीण द्वारे आकड्याची तपासणी,सांधे आणि हाडांचे आजार यासह विविध सुविधा तसेच या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल च्या माध्यमातून अनेक ख्यातनाम तज्ञ डॉक्टरांची सेवा घेत विविध विभागात अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचे काम चंबुले यांनी सुरू केले आहे. चंबुले यांच्या बाबतीत विशेष म्हणजे ते शून्यातून आले आहेत. एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे त्यांनी आपला भूतकाळ कधीही विसरलेला नाही. आपल्या सेवेतील पैसा गोरगरिबांसाठी कामी यावा. हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून गोरगरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेणे, आपल्या गावी शाळा नाही म्हणून स्व स्वखर्चाने शाळा बांधून देणे, यासोबतच वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना मदत करणे. हे त्यांचे कार्य लोकांच्या डोळ्यात खुपत होते. अत्यंत कर्तबगार असलेल्या डॉ माधव चंबुले यांनी केवळ गोरगरिबांना सेवा देता यावी, आपल्या भागातच सेवा करावी. या उदात्त हेतूने मोठ्या शहरातून ते उदगीर सारख्या छोट्या शहरात आले. मात्र त्यांचे हे औदार्य खूप कमी लोकांना समजले.डाॅ.चंबुले यांच्या विरोधात केले गेलेले सर्व आरोप खोटे असून ते गुन्हे परत घ्यावेत. अशी आग्रही मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आपण करत आहोत. असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.