शिव संप्रदाय मंडळ संस्काराचे केंद्रबिंदू – राजकुमार बिराजदार

शिव संप्रदाय मंडळ संस्काराचे केंद्रबिंदू - राजकुमार बिराजदार

 उदगीर (एल. पी. उगिले) : शिव संप्रदाय मंडळ हे समाजामध्ये सुसंस्काराचे बीज पेरणारे, सामाजिक जाणीवा जपण्याचा मंत्र देणारे केंद्रबिंदू ठरावे.असे विचार सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजकुमार बिराजदार बामणीकर यांनी व्यक्त केले. ते श्री गुरु हावगीस्वामी मठ येथे संपन्न झालेल्या शिव संप्रदाय मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदावरून बोलत होते.

 याप्रसंगी श्री गुरु हावगीस्वामी मठाचे मठाधिपती शंभोलिंग शिवाचार्य महाराज यांचे सानिध्य लाभले होते. तसेच वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष सहकार महर्षी चंद्रकांत आण्णा वैजापूरे, उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, कीर्तनकार संघटनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष शिवराज नावंदे गुरुजी, कीर्तनकार भगवानराव बाबा पाटील चामरगेकर, दयानंद नागापल्ले, किशोर पाटील गुरुजी कौळखेडकर, माजी सरपंच राजेश्‍वर पाटील लाळीकर, बसवराज ब्याळे, चांदेगावकर स्वामी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

 याप्रसंगी शिवराज नावंदे गुरुजी आणि भगवानराव बाबा पाटील यांनी शिव संप्रदायाबद्दल मौलिक विचार मांडले. तर शंभोलिंग शिवाचार्य महाराज यांनी आशिर्वचन दिले. अध्यक्षपदावरून बोलताना राजकुमार बिराजदार यांनी स्पष्ट केले की, सद्यस्थितीत नव्या पिढीला शाळा, महाविद्यालयातून शिक्षण मिळत आहे. मात्र ते केवळ सुशिक्षित होत आहेत. त्यांना संस्कारित करण्याचे काम शिव संप्रदाय मंडळाने केले पाहिजे आणि ते करत आहेत. याला आणखी गती यावी. या मंडळाच्या हातून समाज घडावा. समाजातील प्रत्येक तरुण निर्व्यसनी यांनी राष्ट्रभक्तीने ओतप्रोत होऊन सामाजिक जाणिवा जपणारा निघावा, कारण दिशाहीन समाज आणि व्यसनाधीन युवक हे अस्तित्वहीन असतात. समाज घडवायचा असेल तर नव्या पिढीला सुसंस्कारित करण्याची गरज आहे. असेही स्पष्टीकरण राजकुमार बिराजदार यांनी याप्रसंगी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंद स्वामी देवर्जनकर यांनी तर आभार चंदरअण्णा वैजापूरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी मानले.

About The Author