उदयगिरीत वन्यजीव रक्षक सिद्धार्थ सोनवणे यांची सदिच्छा भेट
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्जीवन केंद्र, तागडगावचे संस्थापक सिद्धार्थ सोनवणे यांनी दुर्मिळ वनस्पती उद्यानाला भेट दिली. सर्पमित्र, वृक्षप्रेमी, पर्यावरणस्नेही सिद्धार्थ सोनवणे यांनी स्वतःच्या मालकीची 18 एकर जमीन वन्यजीव संरक्षण व पर्यावरण संवर्धनासाठी वापरत आहेत. आजवर त्यांनी 16000 हून अधिक वन्य जीवांवर उपचार केले असून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले आहे. अनेक वन्यजीव सांभाळण्याचे कार्यही त्यांच्याकडून सुरू आहे. ‘शहाणी माणसे इतिहासाचे वाचन करतात व वेडी माणसे इतिहास निर्माण करतात’, या वाक्याचा प्रत्यय सिद्धार्थ सोनवणे यांना पाहिल्यानंतर येतो, अशा प्रकारचे मत प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी व्यक्त केले. यावेळी पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. जयप्रकाश पटवारी यांनी महाविद्यालयातील दुर्मिळ वनस्पतीची माहिती सिद्धार्थ सोनवणे यांना दिली. महाविद्यालयाच्या या उपक्रमाबद्दल सिद्धार्थ सोनवणे यांनी देखील समाधान व्यक्त केले. सिद्धार्थ सोनवणे यांच्या वन्यजीव संरक्षण व पर्यावरण पूरक कार्याची दखल घेऊन महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे, डॉ. जयप्रकाश पटवारी, रेणापुर येथील वृक्षमित्र शिवशंकर चापुले यांची विशेष उपस्थिती होती.
