डॉ.नरसिंग कदम यांना नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय साहित्य गौरव पुरस्कार जाहीर

0
डॉ.नरसिंग कदम यांना नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय साहित्य गौरव पुरस्कार जाहीर

उदगीर (एल.पी.उगीले) छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक साहित्यिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे, तसेच मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबईचे सदस्य प्रा.डॉ.नरसिंग कदम यांना जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूर यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय साहित्य गौरव पुरस्कार जाहीर झाला. तशा निवडीचे पत्र नुकतेच त्यांना संस्थापक अध्यक्ष डॉ. दीपककुमार खोब्रागडे, सरचिटणीस डॉ.प्रकाश करमाडकर यांच्या सहीचे प्राप्त झाले. सदरील पुरस्कार दि. 30 मार्च 2025 रोजी 11व्या वर्धापन दिनानिमित्त नागपूर येथे प्रदान करण्यात येणार आहे.
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाची स्थापना नागपूर येथे सामाजिक स्तरावरील विविध कार्य करण्याच्या आदर्श उद्देशाने झालेली आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक साहित्य संमेलने आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेतलेले आहेत. एक आंबेडकर साहित्य आणि संस्कृती संवर्धन करणारे मंडळ आहे. अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यामध्ये अग्रगण्य असणारे हे एक मंडळ आहे.
डॉ कदम यांनी साहित्यिक क्षेत्रात जीवनशैली चारोळी संग्रह, निर्भया कवितासंग्रह, गोंडर कविता संग्रह, धडक बेधडक वात्रटिका संग्रह, संघर्षयोद्धा बापूसाहेब चरित्रात्मक काव्यसंग्रह, लिहिलेला आहे. गड्या आपला गाव बरा बाल कथासंग्रह, मला संस्कारित विद्यार्थी बनायचे बाल कादंबरी, श्रीराम गुंदेकर : व्यक्ती आणि वांङमय, महानुभाव संप्रदाय: स्वरूप आणि विशेष, महात्मा फुलेंचे कार्य : शोध आणि बोध,महात्मा फुले : साहित्य आणि विचार, आधारस्तंभ बाप, अण्णा भाऊ साठे आणि मार्क्सवाद, मराठी भाषिक कौशल्ये आणि रोजगाराच्या संधी हे त्यांचे संपादित ग्रंथ आहेत. जागतिकीकरण आणि मराठी साहित्य या ग्रंथाचे ते सहसंपादक राहिलेले आहेत तर लातूर वसा आणि वारसा या संपादित ग्रंथाचे ते संपादकीय सदस्य आहेत असे त्यांचे एकूण वीस ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. रक्तदान शिबिर,रक्तगट तपासणी शिबीर,पल्स पोलिओ अभियान, ग्रामस्वच्छता अभियान, बोर पुनर्भरण, शोषखड्डे, डेंगू,मलेरिया, हत्तीरोग, वैज्ञानिक जाणीव जागृती या संबंधाने रॅलीचे आयोजन केलेले होते. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अशासकीय सदस्य, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अहमदपूर तालुकाध्यक्ष, रोटरी क्लब सदस्य आदी स्वरूपाचे विविध सामाजिक कार्य केलेले आहे.त्यांचे अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय नियतकालिकामध्ये शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत.यापूर्वी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय स्तरावरील साहित्यिक,शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. विविध वर्तमानपत्रांमध्ये ते सातत्याने लेखन करत असतात.या निवडीबद्दल त्यांचे किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, सचिव पी.टी. शिंदे, उपाध्यक्ष माधवराव पाटील, सहसचिव हिरागीर गिरी, कोषाध्यक्ष गुंडेराव पाटील, सदस्य ज्ञानदेव झोडगे, रामराव एकंबे,काकासाहेब पाटील, भिमराव पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एम. मांजरे, प्रबंधक बालाजी पाटील यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!