अंधांच्या अभिनयासाठीच्या प्रवासमुलाखतीतून उघडली ब्रेल मॅन ची स्टोरी
उदगीर (एल.पी.उगीले)
अंध विद्यार्थ्यांच्या नाट्य स्पर्धेसाठी तयारी करताना चक्क स्वतःच्या डोळ्याला पट्टी बांधून अंधानुभव घेत स्वागत थोरात यांनी अंधांसाठीच्या नाट्य सेवेला प्रारंभ केला. रंगभूमीवरील अंधांच्या या नाट्यविष्काराची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये झाली. असे रेकॉर्ड करणारे ब्रेलमन स्वागत थोरात यांच्या मुलाखतीतून अंधांसाठीच्या नाट्य चळवळीची कहाणी उदगीररांसमोर आली.
अरुणा अभय ओस्वाल रिसर्च सेंटर फॉर ब्लाइंड स्टूडेंट आणि उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वयंसिद्धता आणि सहसंवेदना सजगता दोन दिवसीय कार्यशाळेतील ‘चला डोळस होऊ या’ या मुलाखतीत हा कार्यपट उघडला गेला. साहित्यिक धनंजय गुडसूरकर व अर्चना पैके यांनी स्वागत थोरात यांना बोलते करत त्यांच्या कार्याचा पट उदगीरकरासमोर मांडला. उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया, अंध विद्यार्थी कार्यशाळा प्रशिक्षक स्वरूपा देशपांडे यांची विशेष उपस्थिती होती.
मुलाखती दरम्यान बोलताना स्वागत थोरात म्हणाले, अंध व्यक्तीचे जीवन समजून घेण्यासाठी मी स्वतः घरामध्ये डोळ्यावर पट्टी बांधून जगायला शिकलो. तसेच स्वतः केलेल्या प्रयोगातून अंध व्यक्तीचे जीवन समजून घेऊ लागलो. त्यामुळेच शांता शेळके लिखित ‘आंधळी’ या हेलन केलर च्या जीवनावरील चरित्रकथेचे प्रकट वाचन केले. अंध विद्यार्थ्यांना घेऊन ‘स्वातंत्र्याची यशोगाथा’ ही एकांकिका 88 कलावंतासह संपूर्ण महाराष्ट्रभर सादर केली. त्याचबरोबर पु. ल. देशपांडे लिखित ‘तीन पैशांचा तमाशा’ हे नाटक देखील अंध कलावंतांना सोबत घेऊन महाराष्ट्रभर त्याचे प्रयोग केले. ज्याप्रमाणे प्रत्येक सर्वसामान्य माणसांमध्ये एक कलावंत लपलेला असतो त्याचप्रमाणे तो अंध व्यक्तीमध्ये देखील कलावंत सुप्त स्वरूपात असतो, त्याला जागृत करण्याचे काम आम्ही केले. स्वागत थोरात यांनी आजवर अंध विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कार्याचा जीवनपट मुलाखती दरम्यान उपस्थित श्रोत्यांसमोर ठेवला. दोन दिवसांमध्ये अनेक अंध विद्यार्थ्यांना व समाजातील डोळसांना स्वयंसिद्ध व सहसंवेदना सजगता करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, असे मत डॉ.रामप्रसाद लखोटिया यांनी व्यक्त केले. उदगीर शहरातील व शहराबाहेरील अनेक अंध विद्यार्थी, पालक तसेच नागरिक बहुसंख्येने कार्यशाळेसाठी उपस्थित होते.
