एकंबेकर महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण

0
एकंबेकर महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण

उदगीर (एल.पी.उगीले)
कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर महाविद्यालयात पदवी वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठ व्यवस्थापन सदस्य प्राचार्य डॉ. सूर्यकांत जोगदंड तर कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव डॉ. विजयकुमार पाटील होते. तसेच मंचावर संस्थेच्या कोषाध्यक्षा मृदुला पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमप्रकाश क्षीरसागर, डीएड विद्यालयाचे प्राचार्य सूर्यवंशी उपस्थित होते.
सुरुवातीस स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. विद्यापीठ गीत व स्वागत गीत सादर करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ओमप्रकाश क्षीरसागर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर डॉ. सुरेखा दाडगे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडून पाहुण्यांची ओळख करून दिली.
प्रमुख पाहुणे डॉ. सूर्यकांत जोगदंड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, “विद्यापीठात मिळालेल्या शिक्षणाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करावा. प्रामाणिकपणा आणि सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळेल.” त्यानंतर संस्थेचे सचिव डॉ. विजयकुमार पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. ते म्हणाले, “शिक्षण हे केवळ पदवी मिळवण्यासाठी नसून, ते सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे प्रभावी साधन आहे. देशाच्या प्रगतीसाठी तरुण पिढीने सक्रिय योगदान द्यावे.”
संस्थेच्या कोषाध्यक्षा मृदुला पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “पदवी प्राप्त करणे हा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण व समाजसेवेच्या माध्यमातून देशाच्या विकासाला हातभार लावावा.”
विद्यार्थ्यांच्या वतीने मुजावर मुबिना व अरुण कांबळे यांनी मनोगत व्यक्त करत आपल्या शिक्षकांचे आणि पालकांचे आभार मानले. मुबिना म्हणाली, “या पदवीमुळे आमच्यावर आणखी जबाबदारी वाढली आहे. आम्ही आमच्या शिक्षणाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करू.” यानंतर विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
समारंभाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गणेश बेळंबे यांनी केले, तर आभारप्रदर्शन प्रा. संजय माने यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!