हाडोळती पाझर तलाव क्र.एक च्या पाळूवर झाडेच झाडे; धोक्याची घंटा
उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग अहमदपूर चा गलथान कारभार
अहमदपूर [ गोविंद काळे ] : या तालुक्यातील हाडोळती येथील गोरे मंडळी या ठिकाणी सन 82- 83 मध्ये पाझर तलावाचे काम सुरु करण्यात येऊन त्याचे काम पूर्ण होऊन सन 1999 च्या दरम्यान पाळुचे तोंड बंद करण्यात आले.
पण उपविभागीय पाटबंधारे कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे व निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे तलावात पाणीसाठा जास्त होऊन तो अचानक खचला पण शासकीय यंत्रणेच्या कार्य तत्परतेमुळे हाडोळतीकर प्रचंड नुकसान होण्यापासून बचावले.आता याच तलावाच्या पाळू वर भलेमोठे झाडेच झाडे आल्यामुळे पुन्हा एकदा या तलावाला धोका निर्माण झालेला आहे.
हाडोळती येथील पाझर तलाव क्रमांक एक हा पाटबंधारे उपविभाग कार्यालय क्रमांक दहा अहमदपूर अंतर्गत तयार करण्यात आलेला आहे. या कामाच्या वेळी पाळू मध्ये काळी माती भरणे महत्त्वाचे होते पण अधिकाऱ्यांनी मातीऐवजी चक्क मुरूम भरला. भ्रष्टाचारामुळे सर्व काम निकृष्ट दर्जाचे झाले. काम अनेक वर्ष रखडलेले होते 1983 ला पाझर तलावाचे काम सुरू झाले आणि सन1999 मध्ये पाळूचे तोंड बंद करण्यात आले होते. यानंतर या भागात जोरदार पाऊस झाला आणि पाझर तलावात पाणीसाठा भरपूर झाल्यामुळे आणि हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे तो अचानक खचला. याप्रसंगी ” काळ आला होता पण वेळ आली नव्हती ” अन्यथा हाडोळती गावकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले असते. यावेळी पाळू च्या बाजूने सांडवा काढून तलावातील पाणी सर्व सोडून देण्यात आले. नंतर मेकानिकल युनिटच्या माध्यमातून तेथे पूर्वीच्या पाळुच्या मागे व पुढे दोन्ही बाजूंनी नवीन पाळू तयार करण्यात आला. पण अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आजही येथे पाणी साठा पूर्ण क्षमतेने होत नाही. यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
या तलावाचा शेतकऱ्यांना, जनावरांना फायदा होण्यासाठी तलावाचे सांडव्याद्वारे सोडण्यात आलेले पाणी सांडव्या मध्ये गेट बांधून ते थांबवले पाहिजे. येथील उपविभागीय अभियंता ओम थोरमोटे यांच्या दुर्लक्षामुळे येथील सर्व पाळु वर भली मोठीच्या मोठी झाडे आली असून याचा धोका होऊन शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होणार आहे. येथील उपअभियंता थोरमोटे हे अहमदपूरला न येता भ्रमणध्वनीद्वारे आपला कारभार चालवत असल्याचे समजते.
चौकट ————————————————-
शासनाने शेतकऱ्यच्या हितासाठी लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या तलावात पाणी साठवून राहत नसल्यामुळे याची दुरुस्ती केल्यास तलावाच्या परिसरातील जमीन सर्व ओलीताखाली येणार आहे. कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग लातूरचे कर्तव्यदक्ष अधिकारी जगताप यांनी हाडोळती पाझर तलाव क्रमांक एक च्या कामाकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताचे काम करण्याची मागणी येथील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
अहमदपूर येथील उपविभागीय अभियंता पाटबंधारे ओम थोरमोटे हे आपला कारभार लातूर येथून म्हणजेच “उंटावर बसून शेळ्या राखन्या सारखे काम ” करीत असल्याचे समजले. यांनी त्वरित पाळु वरील वाढलेली झाडे तोडणे महत्त्वाचे आहे. अन्यथा पुन्हा धोक्याचा सामना करण्याची वेळ येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. आज पर्यंत या तलावाकडे एकही अधिकारी फिरकला नाही.यामुळे तलावाच्या पाळुवर भली मोठी झाडे वाढलेली आहेत.