एलसीबीच्या जोरदार कामगिरीला आली भलतीच धार !!अटक झाले घरफोड्या करणारे अट्टल गुन्हेगार !!

0
एलसीबीच्या जोरदार कामगिरीला आली भलतीच धार !!अटक झाले घरफोड्या करणारे अट्टल गुन्हेगार !!

लातूर (ऍड. एल.पी.उगीले)
जीवन जगत असताना अनेक जण अनेक नाटकं करत असतात. मात्र कोणालाही पैशाचे नाटक करता येत नाही, असे म्हणतात. पण काही अति शहाणे वाटेल त्या मार्गाने पैसा मिळाला पाहिजे, असा अट्टाहास करून शान शौक मध्ये जगणे पसंत करतात. कित्येक वेळा झटपट श्रीमंत होण्याच्या नादात त्यांना चुकीच्या मार्गाने जावे लागते. कित्येक वेळा गुन्हेगारी जगताचा आधार घेऊनच ते पुढे जात असतात. पण म्हणतात ना, “कायद्याचे हात लांब असतात, आणि आज ना उद्या चोरटे पोलिसांच्या जाळ्यात सापडतात” नेमकी तीच कर्तबगारी लातूर जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने करून दाखवली आहे.
या शाखेच्या या कर्तबगारीमुळे अट्टल घरफोडी करणारे चोरटे जेरबंद झाले आहेत. यातील एकावर तर तब्बल 23 गुन्हे दाखल आहेत. कदाचित इतरही गुन्हे उघड होऊ शकतील, अशी शक्यता पोलिसांना आहे.
तरुण वयात आल्यानंतर श्रीमंताची मुले ज्या पद्धतीने मौज मस्ती करत जागतात, तशाच पद्धतीने आपणही जगले पाहिजे, असे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र तशा पद्धतीने जगण्यासाठी पैसा लागतो, आणि मग पैशासाठी चोरी, लुबाडी करावीच लागणार. आणि मग हळूहळू हे तरुण चुकीच्या मार्गाने जायला लागतातं. एकदा का एखादा गुन्हा पचला की मग यांची हिम्मत वाढत जाते. त्यातही जर हे एखाद्या वेळेस जेलची हवा खाऊन आले तर मग जेलमध्ये भेटलेली मित्र मंडळी त्यांना आणखीच हवा देतात. आणि मग जणू दादा बनवतात, खोटी शान शौक करण्यामध्ये हे वास्तविक परिस्थिती विसरून जातात.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या सोबतच राहण्यामध्ये या लोकांना धन्यता वाटायला लागते. आणि हळूहळू मग ते त्या लोकांच्या इशाऱ्यावर गुन्हेगारी जगतामध्ये आणखीच फसत जातात. अशाच पद्धतीने अट्टल गुन्हेगार बनलेल्या आरोपींची संगत त्यांना जीवनातून उद्ध्वस्त करायला कारणीभूत ठरते, असे म्हटले तर वावगे होणार नाही.
लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अत्यंत कष्टाने सतत जिल्हाभर वचक ठेवला आहे. असे असताना देखील काही दिवसापूर्वी रात्रीच्या वेळी औसा रोड, दत्तनगर परिसरातील एका घराचा कडी कोंडा तोडून जणू काही आपण त्या घराचे मालक आहोत, अशा थाटात घरात शिरूर त्या घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरी केल्याची घटना घडली होती. या चोरीची घटना झाल्यानंतर शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी अधिकारी जेष्ठ पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी वेगवेगळी पथके तयार करून अशा पद्धतीच्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गुप्तहेर कामाला लावले होते.
या पथकांकडून अत्यंत बारकाईने गुन्ह्याच्या संदर्भामध्ये तपास सुरू असतानाच, सदरच्या पथकाला नमूद घराचे कडी कोंडा तोडून चोरी करणाऱ्या आरोपींची माहिती मिळाली. प्राप्त झालेल्या माहितीची शहानिशा करून या पथकांनी छत्रपती चौक ते पाच नंबर चौक कडे जाणाऱ्या रोडवरून तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे विजय सुभाष बिरारे, (वय 27 वर्ष राहणार विष्णू नगर जवाहर कॉलनी छत्रपती संभाजी नगर) असे एकाने तर दुसऱ्याने रामेश्वर उर्फ पाप्या सूर्यकांत बजगुडे (वय 23 वर्ष राहणार गणेश नगर जुना औसा रोड लातूर) असल्याचे सांगितले तिसऱ्याने आपले नाव सागर सुनील गायकवाड (वय 28 वर्ष राहणार ड्रायव्हर कॉलनी जुना औसा रोड लातूर) असे असल्याचे सांगितले. या संशयित आरोपींची झडती घेतली असता त्यांच्याजवळ त्यांनी चोरी केलेल्या सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल असा एकूण दोन लाख 47 हजार रुपयांचा मुद्देमाल असल्याचे निष्पन्न झाले.
तसेच त्यांनी आणखी तीन गुन्हे केल्याचेही या पथकाला सांगितले.
आरोपींना चोरलेल्या मुद्देमालासह इतर अनेक गुन्ह्याच्या संदर्भात तपास करण्याकामी शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथे राहणारा आरोपी विजय सुभाष बिरारे हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर संभाजीनगर येथे वेगवेगळ्या प्रकारचे 23 गुन्हे दाखल असून तो लातूर येथे येऊन त्याचे नमूद दोन साथीदारांच्या मदतीने चोरीचे गुन्हे करत होता, अशी माहिती पोलिसांना लागली होती. त्यावरूनच स्थानिक गुन्हे अन्वेषण चे पथक सतर्क झाले होते.
सदरची कारवाई ही लातूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, सपोनी अमित कुमार पुणेकर, पोलीस आमलदार राहुल सोनकांबळे, युवराज गिरी, राजेश कंचे, विनोद चालवाड, मोहन सुरवसे, जमीर शेख, प्रदीप स्वामी, सिद्धेश्वर मदने, सुहास जाधव, धनंजय गुट्टे, गोरोबा इंगोले, संतोष देवडे, गणेश साठे इत्यादींच्या पथकाने यशस्वी करून दाखवली.
घरफोड्यांचा तपास पोलिसांनी लावल्यामुळे पोलिसाबद्दलचा विश्वास जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!