कोरोनाने आई-वडील गमावलेल्या बालकांशी नाते निर्माण करण्याचा राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचा उपक्रम!
अहमदपूर (गोविंद काळे) : राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून. कोरोनाने आई-वडील गमावलेल्या बालकांशी नाते निर्माण करण्याचा राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने उपक्रम हाती घेतला आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीने अक्षरक्षः जनसामान्यांचे जीवन उध्वस्त करुन टाकले आहे. अनेक निष्पाप मुलांनी आपले आई वडील गमावले आहेत. दुर्दैवाने लहान वयातच त्यांच्या वाटयाला पोरकेपण आले. आपल्या महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर दोन्ही पालकांचे छत्र हरवलेली चारशेहून अधिक बालके संकटात सापडली आहेत. त्यांना शासन, नातेवाईक व सामाजिक संस्था मदत करीत आहेत. ही मदत साधारणपणे आर्थिक स्वरुपाची किंवा वस्तू स्वरुपाची आहे. परंतू त्यांना आयुष्यभर साथ देणारा, मायेने त्यांच्याशी आपुलकीचे नाते जोडणारा स्वयंसेवक असणेही गरजेचे झाले आहे. पैशा पलीकडचे आपुलकीचे नाते या मुलांच्या मनामध्ये नवा विश्वास निर्माण करेल. अशा सेवाभावी कार्यकर्त्यांची निवड करुन त्यांना यापैकी प्रत्येक बालकाशी नाते निर्माण करण्याचा उपक्रम राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने हाती घेतला आहे. ह्या उपक्रमाचा आरंभ राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे विश्वस्त तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री अजितदादा पवार यांच्या 22 जुलै रोजीच्या वाढदिवसा निमित्त करत आहोत.
आपल्या जिल्ह्यातील अशा बालकांची माहिती शासनाच्या महिला व बाल कल्याण खात्याकडून प्राप्त झाली आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट या मुलांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील व त्यांना त्यांचे हरविलेले बालपण पुन्हा मिळवून देईल अशी खात्री वाटते. हा उपक्रम राबवताना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टचे आपल्या जिल्ह्यात काम करणारे कार्यकर्ते, या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती देतील. आपणही आमच्या या उपक्रमास आवश्यक ते सहाय्य करावे व मार्गदर्शन ही करावे. अशा आशयाचे पत्र आज जिल्हाधिकारी यांना दिले. तसेच सोबत उपक्रमाची व जिल्ह्यातील बालकांची माहितीही दिली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे, शहर जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, समीर शेख, विद्यार्थी शहर जिल्हाध्यक्ष विशाल विहीरे, युवती जिल्हाध्यक्ष प्रियांका लद्दे, युवती शहर जिल्हाध्यक्ष पुजा गोरे, युवती तालुकाध्यक्ष स्नेहा मोटे, राजेश खटके, विशाल आवडे, प्रविणसिंह थोरात, आकाश गायकवाड, बाबा मोमीन, सोहम गायकवाड, रोहित लामतुरे, साक्षी कांबळे, आरती कांबळे, मोहिनी देवनाळे, संध्या ताई, डी. उमाकांत आदी पदाधिकारी उपस्थित होते.