लातूर शहरात शुद्ध पाणीपुरवठा करा, मनपाला खा डॉ काळगे यांचे निर्देश

0
लातूर शहरात शुद्ध पाणीपुरवठा करा, मनपाला खा डॉ काळगे यांचे निर्देश

लातूर (एल.पी.उगीले) शहरात नळाद्वारे गढूळ आणि पिवळे पाणी वितरित होत असल्याच्या नागरिकाकडून येत असलेल्या तक्रारीची दखल घेऊन खा.डॉ. शिवाजी काळगे यांनी माजी मंत्री तथा लातूर शहर चे आमदार अमित देशमुख यांच्यासह महानगरपालिकेत जाऊन आयुक्त, उपायुक्त, नगर अभियंता, पाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. अशुद्ध आणि गढूळ पाण्यामुळे विविध जातीचे रोग पसरू शकतात, नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. याचे गांभीर्य विचारात घेऊन महानगरपालिकेने शुद्ध पाणीपुरवठा करावे असे आदेश खा. डॉ. शिवाजीराव काळगे यांनी दिले.
प्रारंभी, धरणातील पाण्याची उपलब्धता, पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक यासंदर्भात माहिती घेतल्यानंतर, पिवळे पाणी वितरित होण्याबाबतच्या कारणांची माहिती जाणून घेतली, धरणातील पाणी शेतीसाठी कॅनॉलद्वारे सोडल्यानंतर, पाण्यात मोठ्या हालचाली होऊन, शेवाळ वरच्या बाजूला येतात, या शेवाळ्यांचा तीव्र उन्हाशी संपर्क आल्यानंतर, शेवाळ्याचा रंग पाण्यात उतरत असल्याचे बैठकी दरम्यान सांगण्यात आले, पाण्याचा रंग पिवळा पडत असला तरी ते पिण्यास योग्य असल्याचा खुलासाही यावेळी करण्यात आला. नळाला गढूळ आणि पिवळे पाणी येणे ही अत्यंत गंभीर बाब आहे, यात तातडीने सुधारणा करावी, आवश्यक त्या तंत्रज्ञानाची उपलब्धता करावी, कोणत्याही परिस्थितीत यापुढे असे पाणी वितरित होणार नाही, याची दक्षता घ्यावी अशा सक्त सूचना यावेळी संबंधितांना दिल्या आहेत.
पिवळे पडत असलेले पाणी पिण्यास योग्य आहे असा महापालिका अधिकाऱ्यांचा दावा असला तरी, नागरिक हे पाणी पिण्यास धजावत नाहीत, त्यामुळे सर्व प्रकारच्या उपयोजना करून स्वच्छ पाणीपुरवठा करावा असे निर्देश यावेळी देण्यात आले. लातूर महानगरपालिकेत यापूर्वीच मंजूर करण्यात आलेल्या फेरीवाला धोरणाची तातडीने अंमलबजावणी करावी, हातगाड्या वरून वस्तू विकणारे, त्याचबरोबर फळे आणि भाजीपाला विकणाऱ्यांना तातडीने जागा निश्चित करून देण्यात याव्यात, महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याचे सुशोभीकरण करण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही ती तातडीने करावी,
शहराच्या कण्हेरी भागातील लिंगायत स्मशानभूमीचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, या संदर्भातील न्यायालयाचा आदेश, आणि लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाची भूमिका लक्षात घेऊन यातून सामोपचाराचा मार्ग तातडीने काढावा,लातूर शहरातील खाजगी रुग्णालयाच्या उभारणीत आणि नंतर रुग्णालयांना परवाना देण्यात महापालिकेकडून येत असलेल्या अडचणी संदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनने दिलेल्या निवेदना संदर्भात त्वरित कार्यवाही करावी,
इतर महानगरातील नियमावली लक्षात घेऊन, समस्या सोडवण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाचे कार्यवाही करावी .
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क विकासाचा सर्वंकष आराखडा तयार करण्याच्या यापूर्वीच सूचना दिल्या आहेत, हा आराखडा त्वरित तयार करावा,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पुतळा बनवण्याची जबाबदारी महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्याकडे सोपवावी, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याशेजारी उभारावा, हुतात्मा स्मारक, मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज वाचनालय, मिनी मार्केट मधील दुकानासाठी स्वतंत्र कॉम्प्लेक्स या व इतर सर्व आवश्यक सोयी सुविधांसह हा विकास आराखडा तयार करण्यात यावा. व टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करावी.
नवीन रेणापूर नाका परिसरात नाल्याचे पाणी थांबून निर्माण होत असलेल्या अडचणींची सक्षम अधिकाऱ्याने जाऊन तातडीने पाहणी करावी, आणि ती समस्या सोडवावी. आदि सूचनाही या बैठकीदरम्यान केल्या आहेत.
या आढावा बैठकीस महापालिका आयुक्त देविदास जाधव, उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे,पाणीपुरवठा विभागाचे शहर अभियंता विजयकुमार चव्हाण, मुख्य लेखापरीक्षक कांचन तावडे, मुख्य लेखाधिकारी रावसाहेब कोलगाने, जनसंपर्क अधिकारी रुक्मानंद वडगावे नागरिकांच्या शिष्टमंडळाच्या वतीने माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे , लातूर आयएमए प्रतिनिधी डॉ. सतीश देशमुख, लिंगायत समाज शिष्टमंडळ प्रमुख बसवंतआप्पा भरडे, बाबूआप्पा सोलापूर, फेरीवाला समितीचे अध्यक्ष गौस गोलंदाज, नवीन रेनापुर नाका परिसरातील नागरिकांच्या वतीने विष्णुदास धायगुडे आदिसह संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!