गावच्या सर्वांगीण विकासासाठी वचनबद्ध – सौ. वर्षा केंद्रे
उदगीर (एल. पी. उगिले) : विकास पुरुष राज्यमंत्री ना संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कुमठा खुर्द या गावचा सर्वांगीण विकास करून नागरिकांना अत्यावश्यक असलेल्या सर्व मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायत वचनबद्ध आहे. नागरिकांना लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा ही ग्रामपंचायत पुरवत असून तालुक्यातील आदर्श ग्रामपंचायत बनवून दाखवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. असे विचार कुमठा खुर्द च्या सरपंच सौ. वर्षा सुनील केंद्रे यांनी व्यक्त केले. त्या कुमठा खुर्द येथे कोरोनाविषाणू चा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन कोविड विलगीकरण पक्षाची ग्रामपंचायत व स्वयं शिक्षण प्रयोग सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने गावामध्ये कोविड सेंटरची सुरुवात करताना बोलत होत्या. कुमठा येथे कोविड विलगीकरण सेंटरची स्थापना करण्यात आली असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे दहा बेड आॅक्सीजनसह ची सुविधा, 24 तास लाईट तसेच इतर सर्व सुविधायुक्त असलेले कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच सौ. वर्षा सुनील केंद्रे यांच्या हस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य दिनकर केंद्रे गुरुजी, पाशा सय्यद, सिद्धेश्वर कारभारी, अतुल केंद्रे, अजय बिरादार, तुळशीदास पाटील, आशा वर्कर्स आणि जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक भालके, सहशिक्षक अशोक गुरुजी व सर्व कर्मचारी, गावातीलप्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. पुढे बोलताना सौ. वर्षा केंद्रे यांनी स्पष्ट केले की, राज्यमंत्री ना. संजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण विधानसभा मतदारसंघाचा कायापालट होणार आहे. महाविकास आघाडी ही लोकांना खोटे आश्वासन देत नसून दिलेल्या आश्वासनाची परिपूर्ती करून दाखवते. त्याचे उदाहरण म्हणून उदगीर विधानसभा मतदार संघात चालू असलेल्या विकास कामाकडे पाहता येऊ शकेल. असेही त्यांनी स्पष्ट केले. गावच्या विकासाच्या संदर्भात युवा नेते सुनील केंद्रे हे पूर्ण ताकदीनिशी प्रयत्नाला लागले असून कोणत्याही प्रयत्नात ते कमी पडणार नाहीत. जनतेने साथ दिल्यास निश्चितपणे या भागाचा संपूर्ण विकास करून दाखवला जाईल. असेही त्यांनी सांगितले.