आळ आणि काळ”ला राज्यस्तरीय शब्दांगण वाङ्मय पुरस्कार

आळ आणि काळ"ला राज्यस्तरीय शब्दांगण वाङ्मय पुरस्कार

उदगीर (प्रतिनिधी) : चंद्रपूर जिल्ह्यातील शब्दांगण बहुउदद्देशीय ज्ञान प्रबोधिनी संस्थेद्वारे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय शब्दांगण वाङ्मय पुरस्कार स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनंता सूर यांनी कळविले असून यातील उत्कृष्ट कथासंग्रहासाठी उदगीर जि. लातूर येथील सुप्रसिद्ध साहित्यिक कथाकार प्रा.ज्ञानेश्वर हंडरगुळीकर यांच्या बहुचर्चित “आळ आणि काळ” या कथासंग्रहाची निवड झाल्याचे त्यांनी जाहीर केले.
या पुरस्कारासाठी जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०२० या कालावधीत प्रकाशित झालेल्या कथा, कविता, कादंबरी ई. वाङ्मय प्रकारातील साहित्यकृती मागविण्यात आलेल्या होत्या. एकूण २३८ साहित्यकृतीतून निवड करून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
“आळ आणि काळ” या कथासंग्रहासाठी यापूर्वी पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा दामाजीनगर मंगळवेढ्याचा मसाजी शिवशरण सर्वोत्कृष्ट कथालेखन पुरस्कार मिळाला असून आत्तापर्यंत त्यांना दलित साहित्य अकादमी नवी दिल्ली चा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार, स्व.यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, बडोदे वाङ्मय पुरस्कार, महात्मा फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, अंकुर वाङ्मय पुरस्कार, विंदा काव्यलेखन पुरस्कार, महाराष्ट्र कविरत्न पुरस्कार, दै. एकमत उत्कृष्ट कथालेखन पुरस्कार, महात्मा कबीर समता परिषद सन्मान पुरस्कार इत्यादी बावीसहून अधिक राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत.
लेखक प्रा. हंडरगुळीकर हे शिक्षक साहित्य संघ महाराष्ट्र राज्य या शैक्षणिक ,साहित्यिक संस्थेचे मराठवाड्याचे विभागीय अध्यक्ष असून त्यांना शब्दांगण बहुउदद्देशीय ज्ञान प्रबोधिनी संस्थेचा सन्मानाचा हा उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार मिळाल्याबद्दल जयदीप सोनखासकर, डॉ. गणेश चव्हाण, प्रा.डॉ. राजकुमार मस्के, डॉ. सुशीलप्रकाश चिमोरे,विलास सिंदगीकर, डॉ. भास्कर बडे, प्राचार्य चंद्रशेखर कळसे, प्रा.डॉ. मारोती कसाब, अंबादास केदार, धनंजय गुडसुरकर, प्रा.रामदास केदार, प्राचार्य बी. एम. जाधव यांच्यासह उदगीर-जळकोट परिसरातील साहित्यप्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

About The Author