हेर येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्याची मागणी, परिसरातील रुग्णांचे आरोग्य रामभरोसे

उदगीर (एल. पी. उगिले) : -उदगीर तालुक्यातील हेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. रवी वाघमारे आणि डॉ. रुपाली लोहकरे यांची पोस्ट ग्रॅज्युएशन एम एस सर्जरीसाठी निवड झाल्यामुळे डॉ .रूपाली लोहकरे नाशिक व डॉ रवी वाघमारे पुणे, पिंपरी चिंचवड येथील वैद्यकीय महाविद्यालयात गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी अद्याप कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक झालेली नाही. गुडसूर येथील वैद्यकीय अधिकारी श्रीमती इंगळे यांच्याकडे तात्पुरत्या स्वरूपात येथील चार्ज देण्यात आलेला आहे. परंतु त्या सुद्धा दररोज या ठिकाणी उपस्थित राहत नाहीत.
दस्तूर खुद्द मुख्य प्रशासकीय अधिकारीच उपस्थित नसल्यामुळे कर्मचारी ही मनमानी करत असल्याची चर्चा परिसरात चालू आहे. जरूसावळा गोंधळच आरोग्य विभागाने मांडला की काय असेही बोलले जात आहे.
परवाच करडखेल पार्टी येथे मोठा अपघात झाला होता. तेव्हा येथल एक पेशंट प्राथमिक आरोग्य केंद्र हेर येथे उपचारासाठी आला असता ज्या ठिकाणी अपघात झालेल्या रुग्णास प्रथमोपचार सुद्धा मिळू शकला नाही. तेव्हा त्या रुग्णास उपचार घेण्यासाठी उदगीर येथे जावे लागले.यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे गावातील रुग्णांना सध्या उपचारासाठी दूरच्या ठिकाणी जावे लागत आहे. यामुळे वृद्ध, महिला, गरोदर माता आणि लहान मुलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीतही प्राथमिक उपचार मिळत नसल्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हेर गावात व आजूबाजूच्या परिसरात हजारो लोकसंख्या आहे. तरीदेखील येथे मुख्यालयावर राहून सेवा देणारा कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नाही, ही बाब चिंताजनक आहे. आरोग्य सुविधा ही नागरिकांची मूलभूत गरज असून त्यात हलगर्जी पणा धोकादायक ठरू शकतो, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
त्यामुळे प्रशासनाने त्वरीत दखल घेऊन हेर येथे कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. यासाठी त्यांनी लवकरच लेखी निवेदनाद्वारे आरोग्य विभाग तसेच स्थानिक प्रशासनाकडे निवेदन सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.