जि.प.शिक्षकांच्या अनुभव लेखनांचे संकलन म्हणजेच मी आणि मूल्यवर्धन होय – सचिन डोईजोडे.
उदगीर (एल पी उगिले) जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शासकीय यंत्रणेमार्फत परिवर्तन घडवून आणण्यासाठी निरनिराळ्या अध्यापन पद्धती वापरून विद्यार्थ्यांमध्ये मानवी जीवनमूल्ये रुजविण्याचा केलेला प्रयत्न म्हणजे मूल्यवर्धन होय. असे प्रयत्न करणाऱ्या अनेक शिक्षकांच्या अनुभव लेखनांचे केलेले संकलन म्हणजेच मी आणि मूल्यवर्धन होय असे मत सचिन डोईजोडे यांनी व्यक्त केले.
प्रसिद्ध ग्रंथपाल बाबुराव माशाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या व चला कवितेच्या बनात या उपक्रमांतर्गतच्या 336 व्या वाचक संवादमध्ये सचिन डोईजोडे सुप्रसिद्ध विषय साधनव्यक्ती पं.स.निलंगा यांनी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे बालाजी म्हस्के व अशोक गोपाल संपादित जिल्हा परिषद शिक्षकांच्या वतीने राबवलेल्या विद्यार्थी केंद्रित व ज्ञानरचनावाद या संकल्पनांचा सक्षमपणे वापर करून बालस्नेही पध्दतीने विद्यार्थी व शिक्षक यांच्यात बदल घडवून आणण्यासाठी राबवलेल्या उपक्रमांचे यशस्वी संकलन आणि संपादन म्हणजेच मी आणि मूल्यवर्धन या साहित्यकृतीवर संवाद साधताना डोईजोडे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या 36 जिल्ह्यातील 356 तालुके, 40 हजार 231 शाळांमधील एक लाख पंधरा हजार 146 शिक्षकांमार्फत पहिली ते पाचवी इयत्तेतील शाळांमध्ये हसत खेळत शिक्षण देऊन राज्यघटनेतील मूल्यांशी असलेले नाते निर्माण करून देऊन मुलांमधील वर्तन बदल घडवून आणण्यासाठी केलेले प्रयत्न, काय चांगले, काय वाईट? यांची जाणीव करुन दिल्याने भावी पिढीचे रूप पालटले, शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढली, त्यांना संस्काराची शिदोरी मिळाल्यामुळे वाईट सवयींचे उच्चाटन झाले, शाळेची प्रतिमा उंचावली आणि सर्व अपेक्षा सफल झाल्या.
यानंतर झालेल्या चर्चेत केंद्रप्रमुख शिरीष रोडगे, साधन व्यक्ती डॉ. ज्ञानोबा मुंढे, अभ्यासू वक्ते प्रदीप ढगे, सेवानिवृत्त शिक्षक प्रकाश बिरादार, प्रा. डॉ.बळीराम भुक्तरे, मुरलीधर जाधव, गोविंद सावरगावे, संग्राम पताळे,भागवत जाधव यांचे सह अनेकांनी सहभाग नोंदवला. या सर्वांच्या प्रश्नाला अत्यंत समर्पक अशी उत्तरे देऊन सर्वांचे समाधान करण्याचा प्रयत्न संवादक सचिन डोईजोडे यांनी केला. यानंतर उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथ भेट देण्यात आली. अध्यक्षीय समारोप करताना आदर्श ग्रंथपाल बाबुरावजी माशाळकर म्हणाले की, जीवन सुखी, सफल व आनंदमय करायला लावण्याचे बळ हे वाचनामध्ये असून या वाचनासाठी हा वाचक संवाद अविरतपणे चालू आहे. याचा लाभ प्रत्येकाने घेतला पाहिजे.
या वाचक संवादचे सूत्रसंचालन संयोजक अनंत कदम यांनी केले. पाहुण्यांचा परिचय आनंद बिरादार
यांनी करून दिला तर आभार केंद्रप्रमुख शिवशंकर पाटील यांनी मानले.
