करोडोंचा अपहार करून फरार असलेल्या माहेश्वरी बहुउद्देशिय पतसंस्थेतील रोखपाल सोमनाथ गोरख पंडीतला अटक

लातूर (एल.पी.उगिले) फेब्रुवारी 2024 मध्ये माहेश्वरी बहुउद्देशिय सहकारी पतसंस्था मर्या.लातूर येथील शाखाधिकारी व कॅशियर याने अपहार केल्याची घडना घडलेली होती. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यात विशेष लेखापरिक्षक, सहकारी संस्था, लातूर यांनी दिलेल्या अहवालानंतर पोलीसांच्या तपासाला गती मिळाली. माहेश्वरी पतसंस्थेचा व्यवस्थापक, कॅशियर व इतर यांनी 8,18,89.705/- (आठ कोटी अठरा लाख एकोणनव्वद हजार सातशे पाच रुपये) अपहार केले संदर्भात गांधी चौक पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्ह्याची व्याप्ती व अपहाराची रक्कम मोठी असल्याने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सदरचा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनात अवघ्या पंधरा दिवसांत आर्थिक गुन्हे शाखेने उत्कृष्ट कामगिरी करत नमुद गुन्ह्यातील दिड वर्षापासून फरार असलेल्या कॅशियर सोमनाथ पंडीत हा ढोकी जि.धाराशिव येथे येणार असल्याची माहिती खबऱ्याकडुन मिळाली. त्या आधारे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी ढोकी येथे साध्या वेषात सापळा लावला. पोलीसांना मिळालेल्या बातमीप्रमाणे सोमनाथ हा त्याच्या भावाच्या दुकानात आला. त्याचवेळी पोलीसांनी त्यास 1 मे रोजी रात्री 10 वाजता ताब्यात घेतले आहे.
नमुद आरोपीच्या अटकेतून ठेवीदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. त्याचे कारण की, सदर प्रकरणातील माहेश्वरी पतसंस्थेतील अपहाराची वस्तूस्थिती, सहआरोपीची माहिती, अपहाराच्या रक्कमेचा विनीयोग, याविविध बाबींचा खुलासा होणार आहे. त्यातूनच पोलीसांच्या तपासाला आणखी गती मिळणार आहे. न्यायालयाने आरोपीला 7 मे पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उप-अधीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलीस अंमलदार राजेश्वर हम्पल्ले, नामदेव पाटील, युवराज गाडे, रामानंद इरपे, बाळासाहेब ओवांडकर, अर्जुन कार्लेवाड यांनी केली आहे.